आशा संतोष किरंगे Pudhari
गडचिरोली

Gadchiroli News | आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे : ६ किलोमीटरच्या पायपीटमुळे प्रसववेदना; गर्भवतीसह बाळाचाही मृत्यू

Pregnant Woman Death Gadchiroli | एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

Gadchiroli Pregnant Woman Death

गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकत्व स्वीकारलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघत असल्याची ताजी घटना उघडकीस आली आहे. एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला येथील एका तरुण आदिवासी गरोदर महिलेला सहा किलोमीटरची पायपीट करुनही जीव गमवावा लागला आहे. तिच्यासोबत पोटातील बाळाचाही करुण अंत झाला आहे.

एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला येथील आशा संतोष किरंगे (वय २४) ही आदिवासी महिला नऊ महिन्यांची गर्भवती होती. गावाला जाण्यासाठी मुख्य रस्त्यापासून दुसरा रस्ता नसल्याने जंगलातील खाचखळगे तुडवीत पायवाटेनेच जावे लागते. गावात प्रसूतीची कुठलीही शासकीय सुविधा नाही. त्यामुळे १ जानेवारीला आशा किरंगे आणि तिचा पती संतोष यांनी सहा किलोमीटर अंतरावरील पेठा हे तिच्या बहिणीचे गाव पायी गाठले.

परंतु, चालण्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी तिला प्रसववेदना सुरु झाल्या. तिला तत्काळ रुग्णवाहिकेने हेडरी येथील लॉयड मेटल्सच्या कालीअम्माल इस्पितळात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सिझर करण्याचा निर्णय घेतला. परंतु तोपर्यंत पोटातच बाळ दगावले होते. काही वेळाने वाढलेल्या रक्तदाबामुळे आशानेही प्राण सोडला.

त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तेथे स्त्रीरोग तज्ज्ञ नसल्याने पुन्हा ४० किलोमीटर अंतरावरील अहेरी येथे पाठविण्यात आले. त्यानंतर उशिरा तिचे शवविच्छेदन करण्यात आले.

सीइओ, डीएचओंची भेट

घटनेनंतर आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी सुहास गाडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी तोडसा येथे भेट देऊन माहिती जाणून घेतली. गर्भवती महिला ही आपल्या पतीसह आलदंडी टोला येथून पायदळ पेठा येथे पुजाऱ्याकडे गेली होती. तेथे दोघांनीही मुक्काम केला. मध्यरात्री तिला त्रास होऊ लागल्याने आशा स्वयंसेविकेला बोलावण्यात आले. तिने तत्काळ रुग्णवाहिका मागवली. त्यानंतर गर्भवती महिलेला हेडरी येथील मॉ काली अम्मल इस्पितळात हलविण्यात आले, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी 'दै. पुढारी'ला सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT