Naxals killed in Gadchiroli
गडचिरोली : छत्तीसगड राज्याचा सीमावर्ती भाग असलेल्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी गावानजीकच्या जंगलात पोलिसांशी आज (दि.२७) झालेल्या चकमकीत ४ नक्षलवादी ठार झाले. मृतांमध्ये एक पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे.
२५ ऑगस्टला कोपर्शी परिसरात गट्टा दलम आणि कंपनी क्रमांक १० चे नक्षलवादी पोलिसांचा घातपात करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम.रमेश यांच्या नेतृत्वात सी-६० दलाची १९ व केंद्रीय राखीव दल आणि जलद प्रतिसाद दलाची दोन पथके नक्षलविरोधी अभियानावर रवाना करण्यात आली होती.
त्या भागात प्रचंड पाऊस सुरु असतानाही दोन दिवस पोलिसांनी नक्षलविरोधी मोहीम राबविली. त्यानंतर आज सकाळी नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. पोलिसांचा दबाव पाहून नक्षलवादी जंगलात पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता चार नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले. घटनास्थळावरुन पोलिसांनी एक एसएलआर रायफल, दोन इन्सास व एक ३०३ रायफल आणि अन्य साहित्य ताब्यात घेतले आहे. ही चकमक आठ तास चालली, तसेच मृत नक्षल्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.