Gadchiroli Elephant Attack | पोर्ला परिसरात हत्तींचा धुमाकूळ; साहित्यासह फळबागांची केली नासधूस 
गडचिरोली

Gadchiroli Elephant Attack | पोर्ला परिसरात हत्तींचा धुमाकूळ; साहित्यासह फळबागांची केली नासधूस

आठवड्यापासून पोर्ला परिसरातील गावांमध्ये रानटी हत्तींचा वावर

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली : तालुक्यातील पोर्ला परिसरातील गावांमध्ये रानटी हत्तींचा वावर असून, या हत्तींनी आज पहाटे नगरी येथील मनोहर कुंभारे यांच्या शेतातील विविध साहित्य आणि फळबागांची नासधूस केली.

चालू आठवड्यापासून पोर्ला परिसरातील गावांमध्ये रानटी हत्ती फिरत आहेत. ३३ च्या संख्येत असलेल्या हे हत्ती पाच-सहा दिवसांपूर्वी साखरा येथील नदीतून मार्गक्रमण करताना दिसले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी नवरगाव येथील पिकाचे नुकसान केले. काल रात्री हे हत्ती मोहझरीचा रस्ता ओलांडून नगरी येथे गेले. तेथे हत्तींनी मनोहर कुंभारे यांच्या शेताभोवताल लावलेले तारेचे कुंपण आणि सिमेंट काँक्रिटचे खांब उखडून फेकले. बांबूची झाडेही मुळासकट उपटून टाकली. शिवाय आंब्याच्या झाडांचीही नासधूस केली.

वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा: मनोहर कुंभारे

शेतकरी वन्यप्राण्यांना स्वत:हून कोणतीही इजा पोहचवत नाही. परंतु हे प्राणी शेतातील साहित्य व पिकाचे नुकसान करीत असतील तर ते शेतकऱ्यांना परवडणारे नाही. वन्यप्राण्यांकडून जीवित हानी झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्या टाळण्यासाठी वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या पाहिजे, असे मनोहर कुंभारे म्हणाले.

पाण्याच्या शोधात भटकत आहेत हत्ती: वनपरिक्षेत्राधिकारी

सध्या कडक उन्ह असल्याने रानटी हत्ती पाण्याच्या शोधार्थ भटकत असतात. त्यामुळे ते नदी असलेल्या भागात जातात. हत्तींनी केलेल्या नुकसानीचे पंचनामे करणे सुरु असल्याचे पोर्लाचे वनपरिक्षेत्राधिकारी राजेश पाचभाई यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT