गडचिरोली

Gadchiroli Crime : गडचिरोली हादरली! शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर तरुणाचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह; हत्येचा संशय

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली : शहरातील वर्दळीच्या धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानालगत रविवारी सकाळी एका २४ वर्षीय युवकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हरबचनसिंह खन्नासिंह पटवा (रा. गोकुळनगर, गडचिरोली) असे मृत युवकाचे नाव असून, त्याच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

मिळालेली माहिती अशी की, धानोरा मार्ग ते रेड्डी गोडाऊन चौक या परिसरात सकाळी नागरिक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी (मॉर्निंग वॉक) येत असतात. रविवारी सकाळी व्यायामासाठी गेलेल्या काही तरुणांना शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानासमोरील खुल्या जागेत एक मोटारसायकल उभी दिसली, जिला चावी लागलेली होती. मोटारसायकलच्या बाजूलाच हरबचनसिंह निपचित पडलेला दिसून आला. नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता तो मृतावस्थेत होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. हरबचनसिंहच्या नाक आणि गुप्तांगातून रक्तस्त्राव झाल्याचे प्राथमिक पाहणीत समोर आले आहे. ही बाब लक्षात घेता, आपल्या मुलाचा मृत्यू नैसर्गिक नसून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

तपासाची चक्रे फिरली

मृत हरबचनसिंह पटवा हा गोकुळनगर परिसरात राहत होता. या भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री चालत असल्याची माहिती समोर येत आहे. या अवैध व्यवसायातील वर्चस्ववाद किंवा स्पर्धेतून ही हत्या झाली असावी का? या दिशेनेही परिसरात चर्चा सुरू आहे.

पोलिस काय म्हणतात?

"शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. तोपर्यंत ठोस काही सांगता येणार नाही. अद्याप याप्रकरणी कोणालाही ताब्यात घेतलेले नाही," अशी माहिती पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT