आरोपी विजय नारायण टेकाम  
गडचिरोली

Gadchiroli Murder | किरकोळ वादातून मुलाने डोक्यात काठी घालून केला वडिलांचा खून!

आरोपीस अटक, मुलचेरा तालुक्यातील लगाम चक येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली : घरगुती कारणावरुन झालेल्या किरकोळ वादातून मद्यधुंद मुलाने वडिलांचा खून केल्याची घटना मुलचेरा तालुक्यातील लगाम चक येथे गुरुवारी(ता.४) रात्री घडली. नारायण आशा टेकाम(६१) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलगा विजय नारायण टेकाम(४०) यास अटक केली आहे.

नारायण टेकाम यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. विवाहित मुलगी सासरी राहते, तर नारायण हे आपल्या दोन मुलांसह लगाम येथे आपल्या घरी राहत होते. धाकटा मुलगा कामानिमित्त भामरागड तालुक्यात गेला होता. त्यामुळे नारायण हे मोठा मुलगा विजय यांच्यासोबत राहत होते. गुरुवारी रात्री घरगुती कारणावरुन नारायण टेकाम आणि त्यांचा मुलगा विजय यांच्यात किरकोळ वाद झाला. परंतु मद्यधुंद अवस्थेत असल्याने रागाच्या भरात विजयने वडील नारायण यांच्या डोक्यावर काठीने प्रहार केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपीने केला बनाव

स्वत:च काठीने प्रहार केल्यानंतर आरोपी विजय याने खाली पडल्याने वडिलांचा मृत्यू झाल्याचे गावात जाऊन नागरिकांना सांगितले. तक्रारीनंतर अहेरीचे पोलिस निरीक्षक हर्षल एकरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनास्थळाची पाहणी, साक्षदारांचे जवाब आणि अन्य पुराव्यांच्या आधारे विजयची चौकशी केली असता त्यानेच खून केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपी विजय टेकाम यास अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT