Gadchiroli News | रस्ते आणि पुलाचे काम अपूर्ण: जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली राष्ट्रीय महामार्ग विभागाला कारणे दाखवा’ नोटीस 
गडचिरोली

Gadchiroli News | रस्ते आणि पुलाचे काम अपूर्ण: जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली राष्ट्रीय महामार्ग विभागाला कारणे दाखवा’ नोटीस

सार्वजनिक सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनात निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी नोटीस

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली ता.५: पावसाळा जवळ येत असतानाही रस्ते आणि पुलांची कामे विहित मुदतीत पूर्ण न केल्याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अविशांत पंडा यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना सार्वजनिक सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनात निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी 'कारणे दाखवा' नोटीस बजावत कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी ४ मे रोजी दोन स्वतंत्र नोटिसा जारी केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने दोन मोठ्या प्रकल्पांमधील दिरंगाईवर बोट ठेवण्यात आले आहे. भामरागड तालुक्यातील लाहेरी-बिनागुंडा या मार्गावरील गुंडेनूर नाल्यावरील दोन महत्त्वाच्या पुलांचे बांधकाम १८ जुलै २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, दोन वर्षांचा विलंब होऊनही हे काम अद्याप अपूर्णच आहे. २९ एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता ही बाब उघडकीस आली.

तसेच आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने पावसाळ्यात नागरिकांना लांबच्या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतो, ज्यामुळे त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्हीसंबंधी राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गडचिरोली जिल्हा हा घनदाट अरण्य आणि नद्यांनी व्यापला आहे. अशातच मान्सून लवकरच सुरू होणार असून पुलांअभावी बिनागुंडा परिसरातील गावांचा संपर्क तुटण्याची आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित होण्याची भीती आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिसीत नमूद केले आहे.

लेखी उत्तर आणि प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश

गुंडेनूर पुलाच्या दिरंगाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांकडून लेखी स्पष्टीकरण मागविले आहे, तर आलापल्ली-सिरोंचा महामार्गाच्या कामाबाबत ६ मे रोजी प्रत्यक्ष हजर राहून उत्तर देण्यास बजावले आहे. मुदतीत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास रस्ते अपघातांमुळे होणारी जीवितहानी आणि सार्वजनिक गैरसोयीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना सर्वस्वी जबाबदार धरुन त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाची कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT