suspended  Pudhari News Network
गडचिरोली

Illegal Sand Mining Gadchiroli | अवैध रेती उत्खनन प्रकरणी मंडल अधिकारी, तलाठी निलंबित ; तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे

देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील सिंड्राई रेती घाटावर अवैध रेती उपसा करीत असताना लोडरखाली दबून एका मजुराचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Gadchiroli Revenue Department Action

गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील सिंड्राई रेती घाटावर अवैध रेती उपसा करीत असताना लोडरखाली दबून एका मजुराचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर पावले उचलत मंडळ अधिकारी व तलाठ्यास निलंबित केले आहे, तर तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे.

गुरुवारी (दि.२५) दुपारी सिंड्राई रेती घाटावर अवैध रेती उपसा सुरु असताना लोडरखाली दबून जुनी वडसा येथील विलास देवढगले नामक मजुराचा मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी तत्काळ भरारी पथक नेमून चौकशीचे आदेश दिले. 

उपविभागीय अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार १० जून २०२६ नंतर संबंधित रेतीघाटातून रेती उपसा बंद करण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही तेथे अवैध रेती उपसा आणि वाहतूक सुरु असल्याचे भरारी पथकाने केलेल्या स्थळ पाहणीत निष्पन्न झाले. शिवाय अवैध प्रकारावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक महसूल यंत्रणेकडून अपेक्षित दक्षता घेण्यात आली नसल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी पंडा यांनी कडक भूमिका घेत मंडल अधिकारी अर्चना टिसकुले आणि तलाठी महादास ठाकरे यांना निलंबित केले आहे.

तसेच या प्रकरणातील प्रशासकीय जबाबदारी लक्षात घेऊन तहसीलदार प्रीती डुडलकर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

कोणालाही पाठीशी घालणार नाही: जिल्हाधिकारी

अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीस कोणालाही पाठीशी घालणार नाही. अवैध प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यात कसूर करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी दिला. जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक सतर्कतेने काम करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT