Gadchiroli Chamorshi Road Bus Steering Lock
गडचिरोली : गडचिरोली-चामोर्शी महामार्गावरील शिवणी गावाजवळच्या रस्त्याच्या कडेला राज्य परिवहन महामंडळाची बस उलटल्याने ३१ प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
एमएच ०६-८८४८ क्रमांकाची गडचिरोली आगाराची बस ६८ प्रवासी घेऊन चामोर्शीकडे जात होती. दुपारी ३ वाजताच्या सुमारास गडचिरोलीपासून ८ किलोमीटर अंतरावरील शिवणी गावाजवळ अचानक स्टेअरिंग लॉक झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे बस रस्त्याच्या कडेला उलटली. त्यानंतर नागरिकांनी एकच गर्दी केली. जखमींपैकी २९ प्रवाशांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
यापूर्वी चालत्या बसला तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. ३ सप्टेंबरला आलापल्ली–सिरोंचा मार्गावरील टेकंमपल्ली गावाजवळ अहेरी आगाराच्या बसचे मागील चाक अचानक निखळले होते.
बसेस प्रवासादरम्यान बंद पडणे, छत उडणे, पावसाळ्यात छतामधून पाणी टपकणे, बसचा मागचा भाग तुटणे अशा अनेक घटना यापूर्वी घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एका ऐरणीवार आला आहे. प्रवासी घेऊन निघण्यापूर्वी प्रत्येक बसची काटेकोरपणे तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.