Dina River Bridge Accident
गडचिरोली : नागेपल्ली येथील नातेवाईकाचा अंत्यविधी आटोपून गावाकडे परत जात असताना आलापल्ली-आष्टी महामार्गावरील दिना नदीच्या पुलावरुन कार नदीत कोसळल्याने दोन जण ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना आज (दि.२०) दुपारी १ च्या सुमारास घडली.
यादव विठ्ठलराव कोलपाकवार (वय ७३, रा. आष्टी) व सुनील मुरलीधर कोलपाकवार (वय ५५, रा.बोरी) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात अभिजित यादव कोलपाकवार (वय ४०), अर्चना यादव कोलपाकवार आणि पद्मा सत्यनारायण कोलपाकवार हे गंभीर जखमी झाले.
काल अहेरीनजीकच्या नागेपल्ली येथील आरडी एजंट रवींद्र तंगडपल्लीवार यांची हत्या करण्यात आली. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यासाठी आष्टी येथील अभिजित कोलपाकवार वडील आणि आईला घेऊन गेला होता. वाटेत त्याने बोरी येथील त्याचे काका सुनील कोलपाकवार व पद्मा कोलपाकवार यांनाही सोबत घेतले होते. अंत्यसंस्कार आटोपून परत येत असताना दिना नदीच्या अरुंद पुलावरुन कार नदीत कोसळली.
यात यादव कोलपाकवार हे जागीच ठार झाले, तर सुनील कोलपाकवार यांनी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राण सोडला. कारचालक अभिजित, अर्चना व पद्मा कोलपाकवार हे गंभीर जखमी झाले. गंभीर जखमींवर अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना चंद्रपूरला हलविण्यात आले आहे. या घटनेने बोरी व आष्टी येथे शोककळा पसरली आहे.