Gadchiroli bus brake failure
गडचिरोली : अहेरी येथून सिरोंचाकडे जाण्यासाठी परिवहन महामंडळाची बस निघाली होती. भरधाव वेगाने बस मार्गक्रमण करीत असताना अचानक ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने कौशल्याने काही अंतर गाठल्यानंतर बस थांबविली आणि ८१ प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.
हा थरार आज दुपारी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अनुभवला. त्याचे झाले असे की, अहेरी येथील आगाराची एमएच ४०-एक्यू ६०४२ क्रमांकाची बस प्रवासी घेऊन सिरोंचाकडे जाण्यास निघाली. बसमध्ये पुरुष, महिला आणि लहान मुलेही होती. बसला सिरोंचापर्यंतचे शंभर किलोमीटर अंतर गाठायचे होते. बस धावत असताना नंदीगावच्या पुढे बसचे ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. ही बाब प्रवाशांना कळताच त्यांच्यात भीती निर्माण झाली. परंतु चालकाने अत्यंत कौशल्याने बस हळूहळू पुढे नेत गुड्डीगुडम गावापर्यंत नेऊन थांबवली. त्यामुळे ८१ प्रवाशांचा जीव वाचला. थोड्याच वेळात दुसरी बस आली. त्या बसमधून या प्रवाशांना रवाना करण्यात आले.
ही बस आधीच दोन तास उशिरा निघाली होती. त्यामुळे प्रवासी संतप्त होते. अशातच ब्रेक फेल झाल्याने पुन्हा त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. परिवहन महामंडळाच्या अहेरी आगारात अनेक बसेस भंगार अवस्थेत असून, त्या अजूनही रस्त्यावर धावतात.
दोन वर्षापूर्वी अहेरी आगाराच्या एका धावत्या बसचे छत उडाल्याचा प्रकार घडला होता. शिवाय बसच्या छतातून पावसाचे पाणी टपकत असल्याचा व्हीडिओदेखील व्हायरल झाला होता. एका बसचा चालक एका हातात छत्री पकडून बस चालवत असल्याचेही निदर्शनास आले होते. आता ब्रेक फेल झाल्याची घटना घडल्याने नागरिकांत तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.