जवान सुरेश अंबाडार Pudhari
गडचिरोली

Gadchiroli BSF Jawan Death | सहकारी जवानाने केलेल्या गोळीबारात गडचिरोली जिल्ह्यातील जवानाचा मृत्यू

पश्चिम बंगालच्या मालदा जिल्हृयातील बीएसएफ छावणीतील घटना

पुढारी वृत्तसेवा

BSF Jawan Killed West Bengal

गडचिरोली: पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील बिधाननगर येथील सीमा सुरक्षा दलाच्या छावणीतील सहकारी जवानाने केलेल्या गोळीबारात गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील मरारटोला येथील रहिवासी असलेले जवान सुरेश दुर्गुजी अंबाडार (वय ३७) यांचा मृत्यू झाला.

पश्चिम बंगाल राज्यातील मालदा जिल्ह्यातील वैष्णवनगर पोलिस ठाण्यांतर्गत बिधाननगर येथे सीमा सुरक्षा दलाच्या ११९ व ७१ क्रमांकाच्या बटालियनची छावणी आहे. गुरुवारी (दि.२३) दुपारी ७१ क्रमांकाच्या बटालियनमधील शिवम मिश्रा नामक जवानाने अचानक दोन जवानांवर गोळीबार केला. यात सुरेश अंबाडार व अजयकुमार सिंग (वय ५१, रा. मांझी, बिहार) या दोन जवानांचा मृत्यू झाला, तर विकास ब्रम्हा (वय ४४, रा. मोहंदा (पश्चिम बंगाल) हे गंभीर जखमी झाले.

शनिवारी होणार अंत्यसंस्कार

गडचिरोली जिल्ह्यातील जवान सुरेश अंबाडार यांचे पार्थिव शनिवारी (दि. २५) मरारटोला येथे आणण्यात येणार असून, दुपारी त्याच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहीद सुरेश अंबाडार याच्या पश्चात पत्नी,२ वर्षांची मुलगी, आई, वडील व दोन भाऊ आहेत. त्यांच्या निधनामुळे मरारटोला गावावर शोककळा पसरली आहे.

आरोपीला केले होते निलंबित

वर्षभरापूर्वी आरोपी शिवम मिश्रा याने एका सहकारी जवानावर गोळी झाडली होती, तेव्हा त्याला निलंबित करण्यात आले होते. हा कालावधी संपल्यानंतर काही दिवसांपूर्वीच तो कर्तव्यावर रुजू झाला होता. मात्र, त्याने पुन्हा मोठा घात केला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT