गडचिरोली : बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे आणि बोधगया मंदिर व्यवस्थापन कायदा १९४९ मध्ये सुधारणा करण्याच्या मागणीसाठी आज बौद्ध महासभा आणि इतर आंबेडकरी संघटनांनी गडचिरोलीत धरणे आंदोलन केले.
आंदोलकांनी बोधगया येथे बौद्ध भिक्षूंच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा दिला. शिवाय बोधगया येथील बुद्ध विहारावर बौद्धेतरांनी नियंत्रण मिळवल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. बुद्ध विहार त्वरित बौद्ध भिक्षूंना सोपवावा,अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली. सरकारने मागणी पूर्ण न केल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. त्यानंतर पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष तुलाराम राऊत, रिपब्लिकन पक्षाचे रोहिदास राऊत, संविधान फाऊंडेशनचे गौतम मेश्राम, प्रा.प्रकाश दुधे, हंसराज उंदिरवाडे, बीआरएसपीचे मिलिंद बांबोळे, प्रबुद्ध विचार मंचाचे देवानंद फुलझेले, बंडू खोब्रागडे यांच्यासह संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.