Gadchiroli Bhamragad Health Worker Airlifted
गडचिरोली : मागील दोन दिवसांपासून भामरागडला पुराने वेढल्याने तेथून बाहेर पडणे कठीण होते. या कठिण परिस्थितीत एका गंभीर आजारी आरोग्य सेविकेच्या मदतीला पोलिस विभाग धावून गेला आणि तिचे प्राण वाचविले. सीमा बांबोळे असे आरोग्य सेविकेचे नाव असून, त्या भामरागड तालुक्यातील आरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत.
पर्लकोटा नदीला पूर आल्याने मागील दोन दिवसांपासून भामरागड गाव पुराने वेढलेले असून, मार्ग बंद असल्याने जवळपास ११२ गावांचा संपर्क तुटला आहे. अशातच भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका सीमा बांबोळे यांची प्रकृती आजारामुळे गंभीर होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी सुहास गाडे यांनी ही बाब पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना कळविल्यानंतर त्यांनी तातडीने भामरागडला हेलिकॉप्टर पाठविला. त्यानंतर बांबोळे यांना गडचिरोलीत आणून येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जिल्हा परिषद प्रशासनाच्या सहकार्याने भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस ठाण्यातील कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी तसेच हेलिकॉप्टरचे पायलट श्रीनिवास, सहपायलट आशिष पॉल यांनी प्रक्रिया सुरक्षितरित्या पार पाडली.