Bandia River Kothi Kornar Bridge Damaged Pudhari
गडचिरोली

Bridge Damaged Gadchiroli | मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेला बांडिया नदीवरील कोठी-कोरनार पूल 3 वर्षांतच खचला

बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह; विरोधी पक्षांनी सरकारवर उठवली टीकेची झोड

पुढारी वृत्तसेवा

Bandia River Kothi Kornar Bridge Damaged

गडचिरोली : मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकार्पण केलेला बांडिया नदीवरील कोठी-कोरनार पूल अवघ्या तीन वर्षांतच खचल्याने विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

एटापल्ली आणि भामरागड या दोन तालुक्यांना जोडणारा कोठी-कोरनार या १०५ मीटर लांबीच्या आणि ४ कोटी १० लाख रुपये खर्चून बांधलेल्या या पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि तत्कालिन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत १५ ऑगस्ट २०२३ रोजी झाले होते.

'शहीद वीर बाबूराव शेडमाके पूल' असे नाव या पुलाला देण्यात आले होते. मोठा गाजावाजा करीत झालेल्या या लोकार्पण कार्यक्रमाच्या वेळी बांधकाम विभागाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपली पाठ थोपटून घेतली होती. परंतु अवघ्या तीन वर्षांतच या पुलाने शेवटच्या घटका मोजण्यास सुरुवात केली.

यंदा जुलै महिन्याच्या शेवटच्या तीन दिवसांत जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला आणि ३१ जुलैला पुलाचा काही भाग वाहून गेल्याने त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, पूल खचल्याची संतप्त प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर उमटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आ.रोहित पवार यांनी 'एक्स'वर खचलेल्या पुलाचे फोटो शेअर करीत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्य केले आहे. त्यांनी कामकाजाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत सरकारवर जोरदार टीका केली आहे.

शिवाय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.विश्वजित कोवासे, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अमोल मारकवार, आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सर्वांनी बांधकाम विभागाचे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश

दरम्यान, जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी पूल खचल्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर जबाबदारी निश्चित करुन दोषींवर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT