गडचिरोली: मानापूर येथे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. File Photo
गडचिरोली

गडचिरोली: मानापूर येथे ठार मारण्याचा प्रयत्न; आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

जुन्या वादातून एकाच्या डोक्यावर काठीने प्रहार

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : जुन्या वादातून एकाच्या डोक्यावर काठीने प्रहार करुन त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने आज (दि.४) जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. अमोल उद्धव साखरे (३४, रा.मानापूर, ता.आरमोरी) असे शिक्षा झालेल्या दोषी आरोपीचे नाव आहे.

विजय ढवळे यांच्या डोक्यावर काठीने जोरदार प्रहार

याबाबत अधिक माहिती अशी की, २५ एप्रिल २०२३ रोजी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास मानापूर येथील विजय ढवळे हे गावातील पानटपरीवर बसून असताना अमोल साखरे तेथे गेला. त्याने विजय ढवळे यांच्या डोक्यावर काठीने जोरदार प्रहार केला. ढवळे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसताच नातेवाईकांनी त्यांना देलनवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि त्यानंतर नागपूरला हलविण्यात आले. घटनेनंतर आरोपी अमोल साखरे हा हातात काठी घेऊन जाताना दिसला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी विजय ढवळे यांचा पुतण्या चेतन ढवळे याने आरमोरी पोलिस ठाण्यात तक्रार केली.

पाहुण्यांच्या वाहनाचे दोन्ही आरसे फोडल्याने वाद

पोलिसांनी आरोपी अमोल साखरेवर गुन्हा दाखल केला. जखमी विजय ढवळे शुद्धीवर आल्यानंतर त्यांचे बयाण नोंदविण्यात आले. वर्षभरापूर्वी माझा पुतण्या चेतन ढवळे याच्या घरी पाहुणे आले होते. त्यावेळी अमोल साखरे याने पाहुण्यांच्या वाहनाचे दोन्ही आरसे फोडल्याने वाद झाला होता. याच रागातून त्याने आपणास मारहाण केली, असे विजय ढवळे यांनी बयाणात सांगितले. वैद्यकीय अहवालातही विजय ढवळे यांच्या डोक्यावर तीन जखमा झाल्याचे आढळून आले.

तपासाअंती पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दोघारोपपत्र दाखल केले. आज या प्रकरणाचा निकाल लागला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी अमोल साखरे यास दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान व सहायक सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT