Anganwadi Workers Protest  Pudhari
गडचिरोली

Gadchiroli News | कोरोना काळातील थकीत भत्त्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केले आंदोलन

अंगणवाडी कर्मचारी, आशा, गटप्रवर्तक आणि अर्धवेळ स्त्री परिचरांनी 'सिटू' संघटनेच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

Anganwadi Workers Protest

गडचिरोली: कोरोना काळात केलेल्या कामाचा मोबदला म्हणून अंगणवाडी कर्मचारी आणि आशा वर्कर यांना आश्वासित केलेला थकीत कोरोना भत्ता तत्काळ द्यावा, या मागणीसाठी सोमवारी (दि.१३) अंगणवाडी कर्मचारी, आशा, गटप्रवर्तक आणि अर्धवेळ स्त्री परिचरांनी 'सिटू' संघटनेच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले.

प्रा.रमेशचंद्र दहीवडे, कॉ.अरुण लाटकर, अमोल मारकवार, सुनंदा बावणे, अरुण भेलके आदींनी यावेळी संबोधित केले. कोरोना काळात देशात सर्वत्र भीतीचे वातावरण असताना सख्खे नातेवाईकही भेटत नव्हते. अशा परिस्थितीत अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, गटप्रवर्तक तसेच अर्धवेळ स्त्री परिचरांनी कोरोना महामारी निर्मुलनाचे काम केले.

त्यावेळी कोरोना संसर्गाचा काळ संपेपर्यंत या कर्मचाऱ्यांना दरमहा १ हजार रुपये देण्यात येतील, असे आश्वास देऊन शासनाने या कर्मचाऱ्यांकडून जवळपास २४ महिने काम करवून घेतले होते. परंतु त्यांना केवळ एका महिन्याचे एक हजार रुपये देण्यात आले. अजूनही २३ महिन्यांचे २३ हजार रुपये शासनाकडे शिल्लक आहेत. ही रक्कम तत्काळ द्यावी, या प्रमुख मागणीसाठी आज धरणे आंदोलन करण्यात आले.

मंदिर बांधकाम आणि कुंभमेळ्यासाठी शासन कोट्यवधी रुपये देते. परंतु केलेल्या कामाचा मोबदला द्यायला सरकारजवळ पैसे नाहीत. ही बाब खपवून घेणार नाही, असा इशारा प्रा.दहीवडे यांनी दिला. मोबदला देण्यासंदर्भात जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चार पत्र काढले. तरीही मोबदला मिळत नसेल तर पत्र कशाला काढले, असा सवाल कॉ.अमोल मारकवार यांनी केला. कॉ.अरुण भेलके यांनी अच्छे दिन राबणारी सर्वसामान्य जनता आणि कर्मचाऱ्यांना आले नसून, ते केवळ मंदिर, रुढी, परंपरा आणि ढोंगी बाबांना आल्याची टीका केली.

आंदोलनाच्या आयोजनासाठी उज्ज्वला उंदिरवाडे, ललीता केदार, विठाबाई भट, सुमन टोकलवार, रंजना टेंभुर्णे, छाया रामटेके, विठोबा एकोनकर, भारती रामटेके, भागिरथा दुधबावरे, कौशल्या गौरकार, माया शेडमाके, बेबी त्रिनगरीवार, संगीता वडलाकोंडावार आदींनी सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT