आरोपी लक्ष्मण आलाम, मृत महेश ओंडिला Pudhari
गडचिरोली

Gadchiroli Crime : तेलंगणातून आलेल्या पाहुण्याचा झोपेत कुऱ्हाडीने घाव घालून खून

अहेरी तालुक्यातील करंचा गावातील घटनेने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Aheri Guest Killed In Sleep

गडचिरोली: तेलंगणा राज्यातून आलेल्या युवकाची झोपेत असताना कुऱ्हाडीने वार करुन हत्या केल्याची थरारक घटना शुक्रवारच्या (दि.१९) मध्यरात्री अहेरी तालुक्यातील करंचा गावात घडली. महेश सत्यणा ओंडिला (वय २८, रा.कर्जी, ता.दायगाम, जि.कोमाराम भीम (तेलंगणा) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी लक्ष्मण सोमा आलाम (वय ५५, रा.करंचा) यास अटक केली आहे.

महेश ओंडिला आणि त्याचा मित्र राजेश चापिला हे १८ जूनला तेलंगणावरुन करंचा येथे आले. शेजारच्या येनकाबंडा गावात तेरवीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते करंचा येथे परतले. रात्री त्यांनी लक्ष्मण आलाम यांच्या घरी मुक्काम केला. तिघेही वेगवेगळ्या खाटांवर झोपले होते. परंतु शुक्रवारी मध्यरात्री लक्ष्मण आलाम याने गाढ झोपेत असलेल्या महेश ओंडिला याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने जोरदार वार केले. यात महेशचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर राजेश चापिला याने मरपल्ली पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मडावी यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीस अटक केली.

आर्थिक व्यवहारातून वाद?

महेश ओंडिला व लक्ष्मण आलाम यांच्यात आर्थिक व्यवहारातून वाद असल्याचे बोलले जात आहे. मृत महेश हा मरपल्ली परिसरातून तेलंगणा राज्यात सागवान लाकडांची तस्करी करत होता. त्यातून आर्थिक व्यवहारातील वाद पुढे आला, अशी चर्चा आहे. मात्र, घटनेपूर्वी दोघांमध्ये नेमका कोणता वाद झाला, याचा उलगडा पोलिस तपासात होईल. मरपल्लीचे प्रभारी ठाणेदार आकाश शिंदे घटनेचा तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT