Caste Validity Certificate Bribery Case
गडचिरोली: मुलीचे जात पडताळणी प्रमाणपत्र काढून देण्यासाठी तिच्या वडिलांकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयातील दोन कंत्राटी सहायकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून अटक केली. मंगेश मनोहर आंबोरकर (वय ४२) व दिनेश कवडू सिडाम (वय ३८) अशी आरोपींची नावे आहेत.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्त्याने त्याच्या मुलीचे जात पडताळणी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाकडे अर्ज केला होता. हे प्रमाणपत्र काढण्याची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत होती. परंतु मुदत संपली असून, कागदपत्रे अपलोड करुन जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी कंत्राटी प्रकल्प सहायक मंगेश आंबोरकर याने ५ हजार रुपयांची मागणी केली, तर दिनेश सिडाम याने आंबोरकरसाठी पुन्हा २ हजार रुपये मागितले.
तडजोडीअंती ते एक हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाले. परंतु लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीने पंचांसमक्ष पडताळणी केल्यानंतर सापळा रचला असता दोघांनी तक्रारकर्त्याकडून १ हजार रुपयांची लाच स्वीकारली.त्यांच्यावर गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक दिगंबर प्रधान, अपर पोलिस अधीक्षक माधुरी बाविस्कर, विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनात व पोलिस उपअधीक्षक विक्रांत सगणे यांच्या पर्यवेक्षणात पोलिस निरीक्षक संतोष पाटील, सहायक फौजदार सुनील पेद्दीवार, हवालदार किशोर जौंजाळकर, राजू पद्मगिरवार, स्वप्नील बांबोळे, प्रवीण जुमनाके, नुतेश धुर्वे, संदीप उडाण, संदीप घोरमोडे, ज्योत्स्ना वसाके, राजेश्वर कुमरे आदींनी ही कारवाई केली.