गडचिरोली : दारुबंदी असलेल्या जिल्ह्यात अवैधरित्या दारुची वाहतूक करणारे चारचाकी वाहन अडवून कुरखेडा पोलिसांनी देशी दारुसह ३ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवारी (दि.२०) रात्री करण्यात आली.
सोमवारी रात्री आरमोरीकडून देसाईगंजमार्गे चारचाकी वाहनातून दारुची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती देसाईगंज पोलिसांना मिळाली. त्यानुसार देसाईगंजचे पोलिस निरीक्षक अजय जगताप यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह पाळत ठेवून वाहनाचा पाठलाग केला. मात्र, वाहन चालकाने पोलिसांना चकमा देत शंकरपूर येथून कुरखेड्याच्या दिशेने वाहन पळविले. देसाईगंज पोलिसांनी ही माहिती कुरखेडा पोलिसांना दिली. तेथील पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गोठणगाव नाक्याजवळ सापळा रचला. यावेळी समोरुन येणाऱ्या चारचाकी वाहनाला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहनचालक पुन्हा पळाला. पोलिसांनी कढोली गावाजवळ वाहन अडविले. वाहनचालक वाहन रस्त्यावर उभे करुन पळून गेला. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात २५ पेट्या देशी दारु आढळून आली. बाजारात या दारुची किंमत १ लाख ४२ हजार ५०० रुपये एवढी आहे. पोलिसांनी ही दारु आणि २ लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन (एमएच ३१-सीएन ७१२०) असा एकूण ३ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, एम.रमेश, श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ, उपनिरीक्षक दयानंद भोंबे, हवालदार शेखलाल मडावी, अंमलदार संदेश भैसारे, नरसिंग कोरे, सहायक फौजदार घागी, देसाईगंजचे पोलिस निरीक्षक अजय जगताप, सहायक पोलिस निरीक्षक मनिष गोडबोले, पोलिस उपनिरीक्षक चेतन परदेशी, हवालदार राकेश दोनाडकर, अंमलदार शैलेश तोरकपवार, नितेश यांनी ही कारवाई केली.