Gadchiroli Police  Pudhari
गडचिरोली

Gadchiroli Fake Currency | शंभर रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या इंजिनिअर सख्ख्या भावांसह चौघांना अटक

गडचिरोली येथील कारगिल चौकातील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये १०० रुपयांच्या २१ नोटा जमा करण्याचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

Fake Notes Racket Gadchiroli Police

गडचिरोली: नागपुरातील एका फ्लॅटमध्ये शंभर रुपयांच्या बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार जणांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील मुख्य सूत्रधार असलेले दोघे सख्खे भाऊ असून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे.

मयूर लक्ष्मीकांत डोईजड (वय ३१) व आदित्य लक्ष्मीकांत डोईजड (वय २६), आदित्य रेचनकर (तिघेही रा. गडचिरोली) व प्रमोद टिकाराम कोवे (वय २३, रा.हळदा, ता.ब्रम्हपुरी, जि.चंद्रपूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

११ मे रोजी प्रमोद कोवे याने गडचिरोली येथील कारगिल चौकातील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये १०० रुपयांच्या २१ नोटा जमा करण्याचा प्रयत्न केला. परंतु नोटा बनावट असल्याने त्या एटीएम मशिनने स्वीकारल्या नाही. त्या एटीएममध्येच अडकल्या. यामुळे प्रमोद कोवे याने बँकेकडे संपर्क केला तेव्हा त्या नोटा बनावट असल्याचे पडताळणींअती बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर बँकेचे व्यवस्थापक प्रतीक अनासने यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी प्रमोद कोवे यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्या नोटा पानटपरी चालक आदित्य रेचनकर याच्याकडून घेतल्याचे सांगितले.

आणि प्रकरणाचे धागेदोरे पोहचले नागपूरपर्यंत

आदित्य रेचनकर यास पोलिसांनी हिसका दाखविताच त्याने नोटा कुठून आणल्या ते सांगितले. त्यानंतर पोलिस थेट नागपुरातील एका फ्लॅटवर पोहचले तेथे मयूर डोईजड व आदित्य डोईजड राहत होते. त्यांच्याकडे नोटा छापण्याचे कलर प्रिंटर,बॅान्ड पेपर, कटर आणि इतर साहित्य आढळून आले. पोलिसांनी ते साहित्य जप्त केले. शिवाय ५०, १०० आणि २०० च्या बनावट नोटाही जप्त केल्या.

झटपट श्रीमंत होण्याचा नाद अंगलट

मुख्य आरोपी असलेले मयूर डोईजड व आदित्य डोईजड हे गडचिरोली येथील सुखवस्तू कुटुंबातील आहेत. मयूरने स्थापत्य अभियांत्रिकीचे, तर आदित्यने यांत्रिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. दोघेही नागपुरात फ्लॅट घेऊन राहत होते. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात दोन्ही भावंडांना कुबुद्धी सुचली आणि त्यांनी घरीच बनावट नोटा छापण्याचा कारखाना सुरु केला. मात्र अखेर पोलिसांनी त्यांनी बेड्या ठोकल्या. मागील चार वर्षांपासून त्यांचा हा गोरखधंदा सुरु असून आतापर्यंत त्यांनी कोणकोणत्या ठिकाणी बनावट नोटा चलनात आणल्या, याविषयीचा तपास पोलिस करीत आहेत, असे पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT