गडचिरोली : आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भामरागड तालुक्यातील पेनगुंडा आणि एटापल्ली तालुक्यातील गर्देवाडा या नक्षलग्रस्त पोलिस मदत केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. शिवाय जनता आणि जवानांशी संवाद साधला. गर्देवाडा येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सुरु झालेल्या एसटी बसचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी या बसमधून प्रवासही केला.
मुख्यमंत्र्यांनी एटापल्ली तालुक्यातील गट्टा-गर्देवाडा-वांगेतुरी मार्ग तसेच ताडगुडा पुलाचे लोकार्पण केले. या दुर्गम व नक्षलग्रस्त भागात जाणारे देवेंद्र फडणवीस हे पहिलेच मुख्यमंत्री आहेत. या कार्यक्रमाला आमदार धर्मरावबाबा आत्राम, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.दिलीप भुजबळ, विशेष पोलिस महानिरीक्षक(नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलिस अधीक्षक नीलोत्पल उपस्थित होते.
गर्देवाडा आणि वांगेतुरी हा परिसर नक्षल कारवायांनी धगधगत होता. परंतू मागील वर्षी दोन्ही ठिकाणी पोलिस मदत केंद्रे तयार झाल्यानंतर विकास कामे होऊ लागली आहेत. नक्षल्यांनी अडवलेली रस्ते आणि पुलांची कामे प्रगतिपथावर आहेत. त्यामुळे आता लोकांची गैरसोय दूर होत असून, नक्षल्यांना जनतेत थारा मिळत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी पंधरा दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या पेनगुंडा येथील पोलिस मदत केंद्राचीही पाहणी केली. शिवाय तेथे आयोजित महाजनजागरण मेळाव्याला संबोधित केले.