Krishnar Tribal Youth FIR
गडचिरोली : एका लग्न समारंभात दिवंगत नक्षल कमांडर माडवी हिडमा याच्यावरील गाणे वाजून डीजेच्या तालावर नृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी एटापल्ली तालुक्यातील कृष्णार येथील ५ आदिवासी युवकांवर गुन्हे दाखल केले आहेत. हिडमाचे उदात्तीकरण करुन लोकांना देशविरोधी कृत्य करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन आदिवासी युवकांवर गुन्हे दाखल होण्याची गडचिरोली जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ असून, राज्यातील ही दुसरी घटना आहे.
शंकर हिचामी, बाबूराव कांदो, चैतू तेलामी, आर्यन हिचामी व शरद कांदो, सर्व रा.कृष्णार, ता.एटापल्ली, अशी आरोपींची नावे आहेत. त्याचे झाले असे की, ६ मे रोजी एटापल्ली तालुक्यातील कृष्णार येथे संदीप हिचामी यांच्या घरी लग्न होते. रात्री तेथे काही युवक-युवती डीजेवर गाणे वाजवून नृत्य करीत होते. रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास पोलिस निरीक्षक मच्छिंद्र नागरगोजे, सहायक पोलिस निरीक्षक मोतीराम मडावी, शिपाई तिरुपती कोरेत, हवालदार तुळशीराम गावडे व शिपाई रोशन पुराम हे गस्त घालत कृष्णार येथे पोहचले. तेथे त्यांना मोठ्याने डीजेवर गाणे वाजत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी संदीप हिचामी यांना रात्रीचे १० वाजले असल्याने डीजे बंद करा, असे सांगून पोलिस ठाणे गाठले.
दुसऱ्या दिवशी ७ मे रोजी पोलिस शिपाई रोशन पुराम यांच्या मोबाईलवर समाजमाध्यमाद्वारे माओवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पीएलजीएचा दिवंगत कमांडर माडवी हिडमा याच्या जीवन चरित्रावर आधारित एक व्हीडिओ क्लीप आली. त्यात 'हमारे हक की जंग है हिडमा, दिल की बस्ती में है हिडमा' या गाण्यावर ४० ते ५० युवक-युवती नृत्य करीत असल्याचे दिसून आले. याविषयाची खात्री करण्यासाठी पोलिस पथक पुन्हा कृष्णार येथे संदीप हिचामी यांच्या घरी गेले. तेव्हा ६ मे रोजी माझे लग्न असल्याने मी शंकर हिचामी यांच्या मालकीचा डीजे बोलावला होता.
आम्ही पारंपरिक आदिवासी नृत्य करीत होतो. थोड्या वेळाने मी घराकडे परत आलो. परंतु नंतर हिडमासंदर्भातील गाणे कोणी लावले, याची मला माहिती नाही, असे संदीप हिचामी याने पोलिसांना सांगितले. डीजे मालक शंकर हिचामी याने आर्यन हिचामी व शरद कांदो यांना डीजेवर ऑपरेटर म्हणून ठेवले होते, असेही संदीपने पुढे सांगितले. अधिक चौकशी केली असता, नृत्य सुरु असताना बाबूराव कांदो याने तेथे येऊन पोलिस आदिवासी गावात कोणाच्या परवानगीने आले. नक्षलवादीच चांगले होते. हिडमा आमचा नेता आहे, त्याचे गाणे कुणाकडे आहे काय, असे विचारले. त्यावर चैतू तेलामी याने आपल्याकडे गाणे असल्याचे सांगून ते ऑपरेटरला वाजविण्यास दिले.
एकूणच देशाची एकात्मता, अखंडता व सार्वभौमत्व धोक्यात येईल, तसेच लोक देशाविरुद्ध अपराध करण्यास प्रवृत्त् होतील असे कृत्य् केल्याचा ठपका ठेवून पोलिसांनी शंकर हिचामी, बाबूराव कांदो, चैतू तेलामी, आर्यन हिचामी व शरद कांदो यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १९७(१)(ड), ३५३(१)(ब), २२३, ३(५) सहकलम ११२, ११७, ३७(१)(३) १३५ मुंबई पोलिस अधिनियमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
नक्षल कमांडर माडवी हिडमा याच्या जीवनचरित्रावर आधारित गाण्यावर नृत्य केले म्हणून गुन्हे दाखल होण्याची राज्यातील ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी पुणे येथील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमात हिडमासंदर्भातील गाणे वाजवले म्हणून किरण गोमासे व श्रीनिवास कुमरी या दोन् विद्यार्थ्यांवर विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. दोन्ही विद्यार्थी गडचिरोली जिल्ह्याचे रहिवासी असून, ते पुण्यात बीबीएचे शिक्षण घेत होते. या घटनेनंतर आता एटापल्ली पोलिसांनी पाच युवकांवर गुन्हे दाखल केले आहेत.