गडचिरोली : गांधीवाद्यांप्रमाणे आम्हा माओवाद्यांचे ध्येयदेखील समताधिष्ठीत समाज निर्मितीचे होते. त्यामुळे एका अर्थाने आम्हीही गांधीवादीचे होतो;पण सशस्त्र!,असे उद्गार आत्मसमर्पण केलेला ज्येष्ठ माओवादी नेता तथा माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा माजी पॉलिट ब्युरो सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती याने 'सर्च' संस्थेच्या भेटीदरम्यान पद्मश्री डॉ.अभय यांच्याशी चर्चा करताना काढले.
आत्मसमर्पण केलेले ज्येष्ठ माओवादी नेते भूपती, दीपा सल्लाकुला, लीना चिंताकिंदी आणि विवेक इर्री यांनी शुक्रवारी(ता.८) ‘सर्च’ संस्थेला भेट देऊन प्रसिद्ध समाजसेवक पद्मश्री डॉ.अभय बंग, डॉ.राणी बंग यांच्याशी विविध विषयांवर विस्तृत चर्चा केली. भूपती म्हणाला, “माझे वडील स्वातंत्र्य सैनिक आणि काँग्रेसचे कार्यकर्ते होते. मी १९७३ पासून विद्यार्थी संघटना व पुढे माओवादी संघटनेद्वारे क्रांती करायला सक्रीय झालो. गांधीवाद्यांप्रमाणे आमचे ध्येयदेखील समतायुक्त समाज निर्माण करणे हे होते. एका अर्थाने आम्हीही गांधीवादीच; पण सशस्त्र!”
भूपती पुढे म्हणाला, “सोव्हिएट युनियन आणि चीनमध्ये सरकार पुरस्कृत भांडवलाशाहीचा उदय झाल्याने भारतातील माओवादी चळवळीची पडझड सुरू झाली. २००० नंतर फक्त दंडाकरण्यातच ही चळवळ टिकली होती. हिंसेच्या मार्गाने क्रांती होणार नाही, याची मला जाणीव २००० मध्येच झाली आणि मी संघटनेत तशी भूमिका वेळोवेळी मांडली होती.”
आत्मसमपर्णानंतर आता गडचिरोलीतच स्थायिक होण्याचा विचार असल्याचा मानस त्याने बोलून दाखवले. जवळपास ४० वर्षांपासून मी गडचिरोलीत कार्यरत आहे. आता घरी जाऊन माझ्यासाठी काय आहे, हे विचारू शकत नाही. मला गडचिरोली आणि येथील माणसांमध्येच राहायचे आहे. ‘सर्च’ने गडचिरोलीत १९८८ ते १९९३ मध्ये दारूबंदीसाठी केलेल्या आंदोलनातून नक्षलवादी चळवळीनेही प्रेरणा घेतली होती, अशी आठवण भूपतीने सांगितली.
गडचिरोलीतील खाण उद्योग आणि स्टील प्रकल्प यामुळे होणारे विस्थापन आणि स्थानिक संस्कृती, पर्यावरणाचे होणारे नुकसान यावर शासनासोबत समन्वयाने मार्ग काढला पाहिजे. पेसा कायद्यानुसार अशा प्रकल्पांत स्थानिक आदिवासींना भागिदारी मिळावी, विस्थापितांचे योग्य पुनर्वसन व्हावे, अशा विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली. यावेळी ‘सर्च’च्या सहसंस्थापक डॉ. राणी बंग, संचालक डॉ.आनंद बंग, उपसंचालक डॉ.आरती बंग, ‘निर्माण’चे संचालक अमृत बंग, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धुमाळ, पोलिस कॉन्स्टेबल गणेश नालगुंडा उपस्थित होते.
काय म्हणाले पद्मश्री डॉ.अभय बंग
लोकांना स्वतःच्या आरोग्यासाठी स्वयंपूर्ण बनवणे, आरोग्याची सत्ता त्यांच्या हाती असणे आणि त्यांना व्यसनापासून दूर ठेवणे,हे क्रांतीच्या दिशेने पहिले पाऊलच आहे, असे मत ‘सर्च’चे अध्यक्ष डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केले. १९७० आणि ८० च्या दशकात भारतातील अनेक युवकांच्या मनात क्रांतीचा विचार प्रभावी होता. क्रांतीचे ध्येय कोणत्या पद्धतीने साकारणार यात मात्र मतभिन्नता होती. लोकांच्या हाती सत्ता जावी, हे क्रांतीच्या दिशेने पडणारे पहिले पाऊल असते. आम्ही त्यासाठी गांधीवादी पद्धतीने आरोग्य-स्वराज्यसाठी काम करतो, असे डॉ.बंग म्हणाले.