Wrong Electricity Bill Tribal Bhamragad
गडचिरोली: एकीकडे देश 'डिजिटल इंडिया' आणि '५-जी' क्रांतीच्या घोषणा करत असताना महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातील तुमरकोठी हे गाव आजही स्वातंत्र्यापूर्वीच्या अंधारात चाचपडत आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यातच प्रशासकीय अनास्थेचा कळस पाहायला मिळत असून, वीज नसतानाही हातात पडणाऱ्या बिलांमुळे येथील आदिवासी बांधवांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे.
छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या भामरागड तालुक्यातील अतिसंवेदनशील आणि दुर्गम अशा तुमरकोठी गावाचा संघर्ष मोठा आहे. ४५ घरे आणि २०० लोकसंख्या असलेल्या या गावात महावितरणने २०२० मध्ये विद्युत खांब उभे केले. गावात पथदिवेही नाहीत. वीज पोहचविण्यासाठी घराघरांत मीटरही लावले आहेत. या उपकरणांतून वीज प्रवाहित झालेली नाही. ज्या घरात अजून विजेचा दिवा लागलेला नाही, त्या गरीब आदिवासींना महावितरणने २०२२ मध्ये चक्क विजेचे बिल पाठवून त्यांची क्रूर थट्टा केली. गावकऱ्यांनी आवाज उठविल्यानंतर महावितरणने बिल पाठवणे बंद केले.
नुकतीच १९ डिसेंबरला तुमरकोठी येथे नवीन पोलिस ठाण्याची स्थापना करण्यात आली.सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस आल्यामुळे आता तरी गावात 'प्रकाश' येईल, अशी आशा ग्रामस्थांना आहे. मात्र, पोलिस विभागाची यंत्रणा सक्रिय झाली असली तरी महावितरण विभागाचा सुस्त कारभार गावातील अंधार दूर करण्यास तयार नाही.
आजच्या युगात मोबाईल ही मूलभूत गरज बनली आहे. तुमरकोठी गावातील तरुणांच्या हातात मोबाईल आहेत, पण ते चार्ज करायचे कुठे? हा मोठा प्रश्न आहे. गावातील लोक घरावरील छोट्या सोलर प्लेट्स किंवा बॅटरीवर मोबाईल चार्ज करण्याचा प्रयत्न करतात. जर उन्ह नसेल तर या दुर्गम भागातील नागरिकांचा संपर्क जगाशी पूर्णपणे तुटतो. डिजिटल साक्षरतेच्या गप्पा मारणाऱ्या सरकारला या गावातील चार्जिंगची समस्याही सोडवता आलेली नाही.
राज्याचे मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नेतृत्व करतात. मात्र, त्यांच्याच कार्यक्षेत्रात आदिवासी बांधवांची ही दुरवस्था प्रशासनाच्या नाकर्तेपणावर बोट ठेवणारी आहे. सामान्य माणसाच्या घरापर्यंत वीज पोहोचवणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे. तुमरकोठीची ही व्यथा केवळ एका गावाची नाही, तर प्रशासकीय अनास्थेचं हे जिवंत उदाहरण आहे. आदिवासींच्या या व्यथेची मुख्यमंत्री दखल घेतात काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.