Bhamragad Floods
गडचिरोली : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला असतानाच लाहेरी येथील गंभीर आजारी नागरिकाला गडचिरोली पोलिसांनी हेलिकॉप्टरच्या साहाय्याने सुरक्षित बाहेर काढून वेळेत उपचारासाठी दाखल केले. या धाडसी आणि तत्पर बचाव कार्यामुळे संबंधित नागरिकाचा जीव वाचला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज लाहेरी येथील रहिवासी श्यामसुंदर नरोटी ( वय ३५) यांची प्रकृती विषबाधा किंवा सर्पदंशामुळे गंभीर झाली होती. अतिवृष्टीमुळे सर्व रस्ते बंद असल्याने त्यांना रुग्णालयात नेणे अशक्य झाले होते. याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि गडचिरोली पोलिसांनी तातडीने समन्वय साधून 'पवन हंस' हेलिकॉप्टर भामरागडकडे रवाना केले.
हेलिकॉप्टरद्वारे श्यामसुंदर नरोटी यांना सुरक्षितपणे गडचिरोली येथे आणून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले. भामरागड येथील पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, तसेच पवनहंस हेलिकॉप्टरचे पायलट अरविंद सैनी व राजीव शर्मा यांनी त्यासाठी परिश्रम घेतले.
दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपत्कालीन परिस्थितीत अंधश्रद्धेला बळी न पडता तातडीने जवळच्या आरोग्य केंद्राशी किंवा प्रशासनाशी संपर्क साधावा, जेणेकरून वेळेत उपचार मिळू शकतील.