Sand smuggling Maharashtra News
गडचिरोली : जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई करत रेतीमाफियांचे धाबे दणाणवले आहेत. सोमवारी (१० जून) मध्यरात्री देऊळगाव आणि डोंगरसावंगी येथील दोन रेतीघाटांवर अचानक छापे टाकून पोलिसांनी सुमारे १ कोटी ४५ लाख ७४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या धडक कारवाईत चार जणांना अटक करण्यात आली असून, रेतीघाटाचा मुख्य मालक मात्र फरार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरमोरी तालुक्यातील देऊळगाव आणि डोंगरसावंगी परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर, १० जूनच्या मध्यरात्री आरमोरी पोलिसांनी एकाच वेळी दोन्ही ठिकाणी छापा टाकला.
डोंगरसावंगी येथील रेतीघाटावर कारवाईदरम्यान, ६० लाख रुपये किमतीची एक पोकलेन मशीन आणि २५ लाख रुपये किमतीचा एक ट्रक आढळून आला. या ट्रकमध्ये ६,७५० रुपये किमतीची १० ब्रास रेती भरलेली होती. पोलिसांनी ही पोकलेन मशीन, ट्रक आणि रेती असा एकूण ८५ लाख ६ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. घटनास्थळावरून ऋषी सितकुरा राऊत (रा. डोंगरसावंगी), विकेशकुमार चंद्रसिंग (रा. मोहाड, जि. यवतमाळ) आणि रुपेश अजित शेख (रा. वर्धा) या तिघांना अटक करण्यात आली.
त्याचवेळी, देऊळगाव येथील वैनगंगा नदीपात्रात सुरू असलेल्या दुसऱ्या रेतीघाटावरही पोलिसांनी छापा टाकला. तेथेही पोकलेन मशीनद्वारे रेतीचा उपसा करून ती जमा केली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी येथून ६० लाख रुपये किमतीची पोकलेन मशीन आणि ६७ हजार ५०० रुपये किमतीची १०० ब्रास रेती असा एकूण ६० लाख ६७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत मोहम्मद तौकिर अब्दूल हसन (रा. अखेरतपूर, मध्यप्रदेश) याला अटक करण्यात आली.
या दोन्ही प्रकरणांमध्ये रेतीघाटाचा मालक शुभम अरुण निंबेकर (रा. आरमोरी) हा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले असून, त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, तो पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरमोरीचे पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरेश सहारे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या कारवाईमुळे अवैध रेती व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.