Alapalli Murder Case
गडचिरोली : दोन दिवसांपूर्वी धारदार शस्त्राने आलापल्ली येथील पतसंस्था अभिकर्त्याची हत्या करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. समय्या मलय्या सुनकरी (वय ३५, रा.मद्दीगुडम, ता.अहेरी) असे आरोपीचे नाव आहे.
अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथील रहिवासी रवींद्र नामदेवराव तंगडपल्लीवार (वय ४९) हे एका पतसंस्थेचे अभिकर्ता म्हणून काम करीत होते. १८ जानेवारीला सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास पतसंस्थेत पैसे भरायला जातो, असे कुटुंबीयांना सांगून ते घराबाहेर पडले. परंतु रात्रीपर्यंत ते घरी आले नाही. दुसऱ्या दिवशी आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील नागमाता मंदिराजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला.
धारदार शस्त्राने त्यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी ठसेतज्ज्ञ आणि न्यायवैद्यक शास्त्राच्या पथकाला पाचारण करुन पुरावे गोळा केले. शिवाय दोन पथके आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली होती. अखेर आज पोलिसांनी आरोपी समय्या सुनकरी यास अटक केली. न्यायालयाने त्यास २८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक हर्षल एकरे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.