गडचिरोली : नगरसेवक पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी भाजपच्या नगरसेविकेने दाखल केलेल्या अर्जावर निर्णय देत जिल्हाधिकारी संजय दैने यांनी अहेरी नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांसह ९ नगरसेवकांना अपात्र घोषित केले आहे. जिल्हाधिकारी दैने यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या अखेरच्या दिवशी काल २४ डिसेंबरला हा निर्णय दिला. नगराध्यक्षा रोजा करपेत, उपाध्यक्ष शैलेंद्र पटवर्धन, नगरसेविका सुरेखा गोडसेलवार, नौरास रियाज शेख, मीना ओंडरे, नगरसेवक विलास गलबले, विलास सिडाम व महेश बाकेवार अशी अपात्र ठरलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.
अहेरी नगर पंचायतीवर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा आदिवासी विद्यार्थी संघाचे तत्कालीन नेते अजय कंकडालवार यांच्या गटाची मागील तीन वर्षांपासून सत्ता होती. त्यांनी शिवसेना (उबाठा) व राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) फुटीर गटाच्या मदतीने सत्ता प्रस्थापित केली होती. सौ. रोजा करपेत नगराध्यक्ष तर शैलेश पटवर्धन उपनगराध्यक्ष होते. परंतु नियमबाह्य निविदा प्रकरण, तत्कालीन मुख्याधिकारी दिनकर खोत यांच्या विरोधातील अट्रॉसिटी प्रकरण अशा विविध प्रकरणांमुळे अहेरी नगर पंचायतीतील सत्ताधारी गट चर्चेत होता.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व सत्ताधाऱ्यांचे नेते अजय कंकडालवार यांनी अहेरी येथील वॉर्ड क्र. १० मध्ये नगर भूमापन क्र. ७८० व ७६६ मधील सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करुन बेकायदेशीररित्या बांधकाम केले होते. नगर परिषद प्रशासनाने त्यांना अतिक्रमण काढून टाकण्याची नोटीसही बजावली होती. परंतु अहेरी नगरपंचायतीच्या ३ ऑक्टोबर २०२२ रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत या बांधकामाला संरक्षण देणारा ठराव पारित करण्यात आला. या विरोधात भाजपच्या वॉर्ड क्र. १५ च्या नगरसेविका शालिनी संजय पोहनेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे डिसेंबर २०२२ मध्ये आक्षेप दाखल केला होता.
दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी संजय दैने यांनी २४ डिसेंबर रोजी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांसह अन्य सात नगरसेवकांनी अनधिकृत बांधकामाला संरक्षण देण्याची भूमिका घेतल्याचा निष्कर्ष नोंदवून त्यांना अपात्र घोषित केले. कालच जिल्हाधिकारी दैने यांची बदली झाली. त्यांनी आपल्या कार्यकाळाच्या अखेरच्या दिवशी ९ नगरसेवकांना अपात्र घोषित केले.