गडचिरोली : भामरागड तालुक्यातील दिरंगी आणि फुलणार गावांच्या जंगलात आज नक्षल्यांशी झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला. महेश नागुलवार(३७) असे शहीद जवानाचे आहे. या चकमकी दरम्यान पोलिसांनी नक्षल्यांचे शिबिर उद्ध्वस्त केले.
दिरंगी आणि फुलणार गावांच्या जंगलात नक्षल्यांनी छावणी उभारल्याची माहिती मिळाल्यानंतर अहेरीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम.रमेश आणि श्रेणिक लोढा यांच्या नेतृत्वात सी-६० पथकाच्या १८ आणि जलद प्रतिसाद पथकाच्या २ तुकड्या त्या भागात काल रवाना करण्यात आल्या. त्यांनी नक्षलविरोधी अभियान राबविण्यास सुरुवात केल्यानंतर आज नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. याच सुमारास नक्षल्यांनी ठिकठिकाणी स्फोटही घडवून आणले. त्यालाही जवानांना सामोरे जावे लागले. या चकमकीत महेश नागुलवार हा जवान शहीद झाला. त्याचा मृतदेह गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला आहे. उद्या सकाळी गडचिरोली येथील पोलिस मुख्यालयाच्या पटांगणावर शहीद महेश नागुलवारच्या पार्थिवाला मानवंदना देण्यात येणार आहे. दरम्यान पोलिसांनी नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त केला असून, नक्षल साहित्य ताब्यात घेतले आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत पोलिस घटनास्थळीच होते.
शहीद जवान महेश नागुलवार हा चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथील मूळ रहिवासी आहे. वृद्ध आई, पत्नी आणि दोन मुली असा त्याचा परिवार आहे. आई एकटीच अनखोडा येथे राहते, तर महेश हा पत्नी आणि दोन मुलींसह गडचिरोलीत वास्तव्य करीत होता. २०११ च्या पोलिस भरतीत त्याची निवड झाली होती. सी-६० पथकात तो कार्यरत होता. महेशच्या निधनामुळे अनखोडा गावावर शोककळा पसरली आहे.