गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांतील ९६ विद्यार्थ्यांची दिल्ली शैक्षणिक सहल  Pudhari
गडचिरोली

Gadchiroli Tribal Students | गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी राष्ट्रपतींच्या भेटीसाठी रवाना

राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना देणार भेट

पुढारी वृत्तसेवा

Gadchiroli Tribal Students President Of India Visit

गडचिरोली : जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या नावीन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांतील ९६ विद्यार्थ्यांची दिल्ली शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली आहे. या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन येथे भेट घेण्याची विशेष संधी मिळणार आहे.

दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना देशाच्या लोकशाही संस्था,ऐतिहासिक वारसा,विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती आणि उच्च शिक्षणाच्या संधींची प्रत्यक्ष ओळख करून व्हावी, हा या सहलीचा हेतू आहे. या सहलीत गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील शाळांमधील ५२, अहेरी प्रकल्पातील २५ आणि भामरागड प्रकल्पातील शाळांमधील १९ अशा एकूण ९६ विद्यार्थी सहभागी झाले असून, त्यांच्यासोबत ९ महिला व पुरुष कर्मचारी मार्गदर्शक म्हणून सहभागी होत आहेत.

२३ ते २८ जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या सहलीत विद्यार्थी चार दिवस दिल्ली येथे मुक्काम करणार आहेत. राष्ट्रपती भवनातील भेटीशिवाय हे विद्यार्थी संसद भवन, पंतप्रधान संग्रहालय, राष्ट्रीय विज्ञान केंद्र, आयआयटी दिल्ली, जंतरमंतर, राजघाट तसेच लाल किल्ला, कुतुबमिनार आणि राष्ट्रीय प्राणीसंग्रहालय यांसारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट देणार आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा

सर्व विद्यार्थी आज गडचिरोली येथून रवाना झाले. यावेळी जिल्हाधिकारी अविशांत पंडा तसेच सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण एम. यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी जिल्हाधिकारी पंडा यांनी विद्यार्थ्यांना या संधीचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन केले. देशातील सर्वोच्च घटनात्मक संस्थांची प्रत्यक्ष ओळख करून घेताना विद्यार्थ्यांनी नवे ज्ञान, अनुभव आणि प्रेरणा मिळवून आपल्या भविष्यासाठी मोठी स्वप्ने पाहावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये वाढेल आत्मविश्वास

दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील संस्था, ऐतिहासिक स्थळे आणि देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावरील व्यक्तीशी प्रत्यक्ष भेटीची संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम त्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच या अनुभवातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून उच्च शिक्षण व स्पर्धात्मक क्षेत्रांकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळेल,अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT