गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रात उघडकीस आलेल्या धान अपहार प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून, १७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकारामुळे एकच खळबळ माजली आहे. चंद्रकांत ज्ञानेश्वर कासारकर (३९,प्रभारी विपणन निरीक्षक तथा ग्रेडर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देऊळगाव), व हितेश पेंदाम (३५, विपणन निरीक्षक तथा ग्रेडर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
आदिवासी विकास महामंडळामार्फत विविध आदिवासी कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडून हमी भावाने धान खरेदी केला जातो. त्यानंतर भरडाईसाठी या धानाचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने नेमलेल्या मिलर्सना बँक गॅरंटीच्या आधारे केले जाते. उचल केलेल्या धानाचे वितरण आदेश हे मिलर्स आणि खरेदी केंद्रप्रमुखाच्या स्वाक्षरीने वजन पावत्यांसह उपप्रादेशिक कार्यालयास सादर करण्यात येते. पुढे मिलर्सनी उचल केलेल्या धानाची भरडाई केल्यानंतर तयार झालेला तांदूळ हा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या अधिनस्त शासकीय गोदामात जमा करण्यात येतो. त्यानंतर जमा केलेल्या तांदळाच्या स्वीकृत पावत्या मिलर्सकडून प्रादेशिक कार्यालयाकडे जमा केल्या जातात, अशी ही प्रक्रिया आहे. परंतु या प्रक्रियेतच देऊळगावच्या सहकारी संस्थेत मोठा घोळ करण्यात आला.
देऊळगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेतर्फे पणन हंगाम २०२३-२४ व हंगाम २०२४-२५ मध्ये आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदी करण्यात आले होते. परंतु साठा पुस्तकानुसार व प्रत्यक्ष शिल्लक धान यात प्रथम दर्शनी तफावत आढळल्यामुळे नाशिकच्या आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या आदेशानुसार शिल्लक धानाची मोजणी करण्यात आली. २०२३-२४ च्या हंगामात १९८६०.४० क्विंटल धान खरेदी करण्यात आले. त्यापैकी प्रत्यक्ष १५९१६.३२ क्विंटल धान भरडाईकरिता गेल्याचे दाखविल्याने ३९४४.०८ क्विंटल धानाची तपावत दिसून आली. शिवाय जुन्या बारदाण्याच्या संख्येतही तफावत आढळून आल्याने १ कोटी ५३ लाख ९३ हजार ९८० रुपयांचा अपहार झाल्याचे आढळून आले.
तसेच २०२४-२५ च्या हंगामातील खरेदीची तपासणी केली असता, १७२६२.४० क्विंटल धान खरेदी करण्यात आले. त्यापैकी प्रत्यक्ष १११२२.४० क्विंटल धान भरडाईकरिता गेल्याचे दाखविल्याने ६१४० क्विंटल धानाची तफावत दिसून आली. शिवाय जुन्या बारदाण्याच्या संख्येतही तफावत आढळून आल्याने २ कोटी ४२ लाख ७२ हजार ८८५ रुपयांचा अपहार झाल्याचे आढळून आले. अशाप्रकारे दोन्ही हंगामात ३ कोटी ९६ लाख ६५ हजार ९६५ रुपयांचा अपहार करण्यात आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
त्यानंतर जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक हिंमतराव सोनवाने यांच्या लेखी फिर्यादीवरुन आदिवासी महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे, प्रभारी विपणन निरीक्षक चंद्रकांत कासारकर, हितेश पेंदाम, महेंद्र विस्तारी मेश्राम यांच्यासह आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देऊळगावचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक, तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी अशा एकूण १७ जणांविरुद्ध काल रात्री उशिरा कुरखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी चंद्रकांत कासारकर व हितेश पेंदाम यांना अटक करण्यात आली. इतर आरोपींचा शोध सुरु आहे. पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ प्रकरणाचा तपास करीत आहेत. पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.