Fraud Case file photo
गडचिरोली

Employment Fraud News | शिपायाच्या नोकरीचे आमिष दाखवून १३ युवकांची ४२ लाखांनी फसवणूक, एकास अटक

मुख्य सूत्रधार राजू मडावी फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांर्गत आश्रमशाळांमध्ये शिपाई पदाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून १३ युवकांची तब्बल ४२ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी आरमोरी पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केले असून, त्यातील एका भामट्यास अटक केली आहे, तर मुख्य सूत्रधार फरार झाला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील राजोली येथील राजू मुखरु मडावी व आरमोरी तालुक्यातील वडधा येथील धर्मेंद्र गणपत शेडमाके यांनी अनेक युवकांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांर्गत आश्रमशाळांमध्ये शिपाई पदावर कायमस्वरुपी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्यातील काही युवक दोषांच्या आमिषाला बळी पडले. त्यांच्याकडून राजू मडावी व धर्मेंद्र शेडमाके यांनी रोख व ऑनलाईन स्वरुपात लाखो रुपये उकळले. मात्र, बराच कालावधी होऊन आणि पैसे देऊनही नोकरी लागत नसल्याने अनेक जणांना शंका आली. विचारणा करताच दोघेही उडवाउडवीची उत्तरे देत होते. त्यामुळे फसवणूक झालेल्यांपैकी सावलखेडा येथील गुणवंत दडमल याने आरमोरी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली.

अखेर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) व ३(५) अन्वये राजू मडावी व धर्मेंद्र शेडमाके यांच्यावर गुन्हे दाखल केले. धर्मेंद्र शेडमाके यास अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मुख्य सूत्रधार राजू मडावी फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

१३ जणांची केली फसवणूक

पोलिस तपासात राजू मडावी व धर्मेंद्र शेडमाके याने १३ युवकांची फसवणूक केल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिस निरीक्षक कैलास गवते करीत आहेत. दरम्यान सरकारी नोकरीसाठी कोणीही अशा भामट्यांच्या प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT