गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील असरअल्ली येथे एका ग्रामपंचायत सदस्याच्या घरी सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यासह १२ जणांना ताब्यात घेतले. ४ नोव्हेंबरच्या या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून २ लाख ३५ हजार २९० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
असरअल्ली येथे ग्रामपंचायत सदस्य धर्मराज वडलाकोंडा याच्या घरी पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी १२ जण जुगार खेळताना आढळून आले. त्यात विनो भूपती, रमाकांत गग्गुरी, सुखदेव मुत्तूनुरी, समय्या कावेरी, रमेश तैनेनी, पोचन्ना ताडबोईना, रमेश गोतुरी, नागेंदर उल्ली, अर्जंन्ना बेडके, मनोज बत्तुला, लक्ष्मीनारायण कटकम व धर्मय्या वडलाकोंडा यांचा समावेश होता. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यातील रमेश तैनेनी हा सरपंच, तर धर्मराज वडलाकोंडा हा ग्रामपंचायत सदस्य आहे.
पोलिसांनी जुगाराच्या डावावरील २४ हजार ५०० रुपयांसह आरोपींकडे अंगझडतीत आढळलेले ७४ हजार ७९० रुपये, तीन दुचाकी व दहा मोबाईल असा एकूण २ लाख ३५ हजार २९० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पोलिस अंमलदार बापूराव काळे यांच्या फिर्यादीवरून असरअल्ली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहायक निरीक्षक समाधान दौड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निखिल मेश्राम तपास करीत आहेत.