गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : गोंडवाना विद्यापीठाला आज (दि. १९) पोलीस बंदोबस्तात पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानववाद अध्यासन केंद्राचा उद्घाटन कार्यक्रम उरकावा लागला. आदिवासी आणि आंबेडकरी संघटनांनी प्रखर विरोध दर्शविल्यानंतर याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
नागपूर येथील वक्ते आशुतोष अडोणी यांच्या हस्ते अध्यासन केंद्राचे उद्घाटन झाले. कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, अध्यासनाचे केंद्र समन्वयक डॉ. अनिरुद्ध गचके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
दरम्यान, या अध्यासनाला विरोध करण्यासाठी आदिवासी युवा परिषद, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष व बीआरएसपी इत्यादी पक्ष आणि संघटनांनी विद्यापीठासमोर निदर्शने केली. कुलगुरु हटाव, विद्यापीठ बचाव, अशा घोषणा देत दीनदयाळ उपाध्याय अध्यासन रद्द करावे, अशी मागणी संघटनांनी केली. या निदर्शनांमध्ये महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. संघटनांचा विरोध लक्षात घेता विद्यापीठापासून बऱ्याच अंतरापर्यंत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे, निमंत्रण पत्रिका असलेल्यांनाच उद्घाटन कार्यक्रमाला प्रवेश देण्यात आला.
विद्यापीठाच्या एकूण कार्यप्रणालीवर आदिवासी नागरिकांमधून तीव्र असंतोष उमटल्याचे दिसून आले. यापूर्वी एका सभागृहात दत्ताजी डिडोळकर यांचे नाव देण्यावरुनही आदिवासी संघटनांनी तीव्र विरोध केला होता. त्यानंतर कुलगुरुंनी हा निर्णय मागे घेतला होता.