गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : सिरोंचा तालुक्यातील असरअली परिसरातील काही गावांमध्ये असलेल्या १९ फर्निचर मार्टवर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी छापे घालून ८ दुकानांमधून सुमारे ७ लाख ८६ हजार रुपयांचे सागवान फर्निचर जप्त केले. याप्रकरणी ८ दुकानमालकांवर वनगुन्हे दाखल करण्यात आले असून, क्षेत्रसहायकास निलंबित करण्यात आले आहे.
रवींद्र कासोजी, संतोष गोत्तुरी, समय्या गंप्पा, देवेद्र गोत्तुरी, किशोर कोरटला, राजेंद्र गोत्तुरी, राजकुमार पोटे व सुरेश अरिंदा अशी वनगुन्हे दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. असरअली परिसरातील काही गावांमध्ये सागवान तस्करी मोठ्या प्रमाणावर होते. अनेक लाकूडतस्कर अवैधरित्या वृक्षतोड करुन त्या भागातील फर्निचर मार्टमध्ये फर्निचर तयार करतात. ही बाब कळल्यानंतर असरअली, जंगलपल्ली, अंकिसा आणि कंबलपेठा या गावांतील जवळपास १९ दुकानांवर वनकर्मचाऱ्यांनी गुरुवारी २२ जूनला छापे घातले. त्यातील आठ दुकानांमध्ये वनविकास महामंडळाच्या अख्त्यारितील जंगलातून अवैधरित्या कापलेली ७ लाख ५१ हजार ५९४ रुपयांचे सागवान लाकडे आढळून आली. शिवाय ३४ हजार ३११ रुपये किमतीची सागवान लाकडे बेवारस स्थितीत आढळली. वन कर्मचाऱ्यांनी एकूण ७ लाख ८५ हजार ९०५ रुपयांची सागवान लाकडे जप्त केली.
आठही दुकान मालकांवर वनगुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच या दुकानांचे परवानेही कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत. शिवाय या अवैध लाकूड तस्करीत सहभाग असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याने असरअलीच्या क्षेत्र सहायकास निलंबित करण्यात आल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. उपविभागीय वनाधिकारी पी.डी. बुधनवर, वनपरिक्षेत्राधिकारी सर्वश्री पी. बी. झाडे, एस.पी.बारसागडे, एन. टी. चौके, पी.एम.पाझारे यांच्यासह ५० कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.