गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : जेसीबी व पोकलेनच्या साह्याने आरमोरी तालुक्यातील डोंगरतमाशी येथील नदीघाटातून बेकायदेशीररित्या रेती उपसा करणाऱ्या १६ जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.
महसुल विभागाच्या आधिकाऱ्यांकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने मागील अनेक दिवसांपासून विविध ठिकाणच्या रेती घाटांमधून रेती तस्करी होत आहे. अशातच आरमोरी तालुक्यातील डोंगरतमाशी येथील खोब्रागडी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर रेतीचा उपसा आणि वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी, उपनिरीक्षक दीपक कुंभारे, राहुल आव्हाड आणि त्यांच्या सहकारी पोलिसांनी १४ मार्चच्या रात्री घटनास्थळी धाड टाकली. यावेळी काही जण ट्रक आणि टिप्परसह जेसीबी आणि पोकलेनच्या साह्याने रेती उपसा करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार १६ जणांना अटक करून ३ कोटी ३० लाख ४० हजारांची वाहने व अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपींमध्ये बहुतांश जण हे गडचिरोली जिल्ह्याबाहेरील आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. रेती तस्करांवर पोलिसांनी केलेली अलीकडच्या काळातील ही सर्वांत मोठी कारवाई आहे.
घरकुल बांधकामासाठी ५ ब्रास रेती मोफत देण्याचे शासनाचे धोरण आहे. परंतु रेती वाहतूकदार अनेक घरकुलधारकांना रेती न देता कंत्राटदार आणि अन्य व्यक्तींना साडेतीन हजार रुपये प्रति ब्रास याप्रमाणे विकून मोठी कमाई करीत आहेत. काहींनी आधीच रेतीचा साठा करुन ठेवला असून, शेतातील रेती म्हणून या रेतीची विक्री केली जात आहे. महसुल प्रशासन झोपेचे सोंग घेऊन असल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.