विदर्भ

भंडारा : माजी आमदार गोविंद शेंडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

रणजित गायकवाड

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : माजी आमदार गोविंद उपाख्य दादा शेंडे यांचे आज (दि.19) दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. दादा शेंडे हे बेटाळा शाळेचे विश्वस्त व अध्यक्ष होते. नेहमीप्रमाणे आज दुपारी 12 वाजता ते श्रीराम विद्यालयात गेले. मुख्याध्यापकांशी शाळेच्या विकासाविषयी चर्चा करत असताना त्यांना अस्वस्थ वाटायला लागले. त्यामुळे त्यांना शाळेनजिक असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून भंडारा येथील रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यांच्यावर भंडा-यातील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

गोविंद उर्फ दादा शेंडे यांचा जन्म मोहाडी तालुक्यातील अकोला येथे झाला. त्यांनी मानसशास्त्र या विषयात एम. ए. केले होते. 1967 ते 1972 या काळात ते मोहाडी पंचायत समितीचे सभापती होते. त्यानंतर काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी 1972 च्या विधानसभा निवडणुकीत भंडारा विधानसभा क्षेत्रात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढली. त्यांचे प्रतिस्पर्धी नाशिकराव तिरपुडे यांचा पराभव करत ते निवडून आले होते. 1972 ते 78 या काळात ते आमदार होते. राष्ट्रवादीचे नेते व खासदार शरद पवार हे त्यांच्या नजिकचे होते. 1978 ते 1990 पर्यंत दादा शेंडे यांनी सलग बारा वर्ष जिल्हा परिषद भंडाराचे उपाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली असा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर 20 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता अकोला येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

SCROLL FOR NEXT