विदर्भ

चंद्रपूर: नोकरी न लावल्याने जिल्हा बँकेच्या अध्यक्षावर गोळीबार: संशयितांची कबुली

अविनाश सुतार

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा: नोकरीच्या आमिषाने पैसे घेऊन फसवणूक केल्याने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत यांच्यावर गोळीबार केल्याची कबुली दोघा संशयित आरोपींनी दिली आहे. घटनेच्या १२ दिवसानंतर या प्रकरणातील आरोपींना चंद्रपूर पोलिसांनी मंगळवारी (दि. २४) ताब्यात घेतले. राजवीर कुंवरलाल यादव (वय 36), अमर कुंवरलाल यादव (वय 29, रा. चंद्रशेखर आझाद चौक, बाबूपेठ, चंद्रपूर) अशी आरोपींची नावे आहेत.

संतोषसिंग रावत यांनी वेकोलीमध्ये नोकरी लावून देण्याकरीता पैसे घेतले. परंतु नोकरी लावून दिली नाही आणि पैसेही परत केले नाही. त्यामुळे रागाच्या भरात दोन्ही आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला, अशी कबुली आरोपींनी दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

काँग्रेसचे नेते तथा चंद्रपूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग चंदेलसिंग रावत यांच्यावर ११ मेरोजी साडेनऊच्या सुमारास हल्ला झाला होता. मुल येथील जिल्हा बँकेच्या शाखेतून घरी जात असताना पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या अज्ञात बुरखाधारी हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. त्यांच्या हाताला गोळी चाटून गेल्याने सुदैवाने ते बचावले. घटनेनंतर आरोपी पसार झाले होते.
या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांनी १६ पथके तयार करून शोध मोहीम सुरू केली होती. मंगळवारी बाराव्या दिवशी सकाळी विशेष पथकांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले.

पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे, पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपुत, महेश कोंडावार, सुमीत परतेकी आदीसह स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस ठाणे मुल, पोंभुर्णा, गोंडपींपरी, सावली, पाथरी, उमरी पोतदार, कोठारी, सिंदेवाही, बल्लारशाह, चंद्रपूर शहर येथील पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT