चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूरहून नागभीडकडे जाणाऱ्या कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅव्हल्सला धडक दिली. या अपघातात कार मधील सर्व सहा जण ठार झाले आहेत. आज (दि. ४) दुपारी चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मृतकांमध्ये रोहन विजय राऊत (वय 30, नागपूर), ऋषिकेश विजय राऊत (वय 28), गीता विजय राऊत (वय 50), सुनीता रुपेश फेंडर (वय 40, नागपूर), प्रभा शेखर सोनवणे (वय 35, रा.लाखनी जि. भंडारा), यामिनि फेंडर (वय 9, रा. नागपूर) यांचा समावेश आहे.
आज (दि. ४) दुपारी (एम एच 49 बी आर 2242) या क्रमांकाची कार नागपूरहून नागभीडकडे जात होती. या कारमध्ये रोहन विजय राऊत, ऋषिकेश विजय राऊत, गीता विजय राऊत, सुनीता रुपेश फेंडर, प्रभा शेखर सोनवणे, यामिनि फेंडर हे प्रवासी होते. याच दरम्यान नागपूर-नागभीड मार्गावर कानपा येथे नागभीडबकडे येणाऱ्या (एम एच 33 टी 2677) या क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सला भिषण धडक दिली. ही धडक एवढी भिषण होती की, यामध्ये एका 9 वर्षाच्या बालिकेचा समावेश आहे.
रोशन विजय राऊत हे वर्षभरापासून विभक्त राहत असलेली पत्नी व मुलाला भेटायला ब्रम्हापूरी तालुक्यातील किन्ही या गावी जात होत. सोबत भाऊ,आई व इतर नातेवाईक होते. ते नागपूर येथील शेजारी रोशन तागडे यांच्या कारने जात होते. कानपा येथे सुमारे ४ वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच नागभीड पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश घारे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर कार मधील सहा जणांना बाहेर काढण्याकरिता कानफा गावातील नागरिकांची मदत घेण्यात आली. या घटनेत दोन महिला व दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी असलेली नऊ वर्षाची बालिका यामिनी रुपेश फेंडर हिला नागपुरला नेत असताना मृत्यू झाला. प्रभा सोनवाने हिचा नागभीड येथील रुग्णालयात मृत्यू झाला.
दरम्यान नागभीड पोलिसांनी घटनेची माहिती नातेवाईकांना दिली. ट्रॅव्हल्स व चालक राजेंद्र लाकडू वैरकर (रा. मेंडकी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांनी भेट दिली. हा अपघात इतका भिषण होता की कारचा चेंदा मेंदा झाल्याने पोलिसांनी तात्परता दाखवत गावकऱ्यांच्या मदतीने कारचे दरवाजे तोडून फसलेल्या मृतकांना व जखमीना बाहेर काढले. जखमी लहान मुलीला ठाणेदार योगेश घारे यांनी आपल्या दोन कर्मचाऱ्यासोबत नागपूर येथील रुग्णालयात पाठवले मात्र वाटेत तीचा मृत्यू झाला.