यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : यवतमाळ जिल्ह्यात सध्या पूराने थैमान घातले आहे. विशेषत: ग्रामीण भागातील रस्तेच बंद झाले आहे. मात्र, अशाही परिस्थितीत नागरिकांना जीव धोक्यात घालून वाट काढावी लागत आहे. मृत्यूशी झूंझतांनाचे ही जीवंत चित्र दारव्हा तालुक्यातील राजूरा गावाजवळून वाहणाऱ्या कुपटा नदीवरील आहे.
या नदीवर पुल आहे. मात्र, थोडासाही पूर येताच तो पाण्याखाली गडप होतो. अशावेळी नागरिकांना नदीवरच बांधलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यावरून जावे लागते. बंधाऱ्याच्या गेटसाठी सोडलेला तब्बल ४ ते ५ फुटांचा (गॅप) ओलांडण्यासाठी मात्र, जीव धोक्यात घालून उडी मारावी लागते. हातणी या गावात इयत्ता चौथीपर्यंतच शाळा असल्याने मुले दारव्ह्यातील शाळांमध्ये शिकतात. अनेकदा पाऊस सुरू झाला की त्यांना सुट्टी दिली जाते. मात्र, राजूरा गावाजवळील या पुलावरून पूर असल्यास शेवटी नाईलाजाने बंधाऱ्यावर चढावे लागते.
शाळकरी मुले व महिलांसाठी काही नागरिक राजूरा गावातून पाटी आणून या बंधाऱ्याच्या गॅपमध्ये ठेवतात. त्यावर कसरत करत वाट काढावी लागते. पावसाळ्यात हातणीच्या शाळकरी मुलांसह नागरिकांसाठी हा जीवघेणा प्रवास नित्याचाच ठरला आहे. प्रशासनाने नागरिकांची ही समस्या निकाली काढावी अशी मागणी आहे.