वाशीम: पुढारी वृत्तसेवा : एकीकडे महिला सन्मानाच्या गोष्टी करायच्या, तर दुसरीकडे महिलांना हिनतेची वागणूक द्यायची, ही सामाजिक विकृती आहे. महिलांचा मान, सन्मान झालाच पाहिजे. परंतु 'विशिष्ट' महिलेलाच बोलले म्हणून महाविकास आघाडीकडून आगपाखड केली जात आहे, अशी टीका भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली.
चित्रा वाघ विदर्भाच्या दौऱ्यावर असून आज (दि. ९) वाशीम येथील सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी राजू पाटील राजे, शाम बढे, नागेश घोपे, दिपीका देशमुख, संगीताताई इंगोले, खटके आदींची उपस्थिती होती.
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी राज्यात 'सिलेक्टेड आऊट्रेड' चालणार नसल्याचे सांगितले. महाविकास आघाडीच्या काळात फेसबुकवर पोस्ट टाकली, म्हणून एका युवतीला कारागृहात टाकले. संजय राऊतांनी एका महिलेला शिव्या घातल्या, पुण्यातील एका महिलेच्या मोटारीत पिस्तूल ठेवली. तो महिलांचा अपमान नव्हता का? असाही सवाल वाघ यांनी केला. राज्यात अडीच वर्षे केवळ ऑनलाईन सरकार होते. शिंदे-फडणवीस सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार असल्यामुळे ते जनतेत जाऊन कामे करीत आहे, असे वाघ यांनी सांगितले.
हेही वाचलंत का ?