प्रातिनिधीक छायाचित्र Pudhari
चंद्रपूर

Teacher Recruitment | अखेर जिल्हा परिषद शिक्षक भरतीला हिरवा कंदील

पवित्र पोर्टलवर ५८५ पदांची जाहिरात अपलोड; लवकरच विकल्प भरण्याची प्रक्रिया सुरू

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षक भरतीची प्रतीक्षा अखेर संपण्याच्या मार्गावर आहे. मागील सहा महिन्यांपासून शिक्षण विभागाने शासन निर्णयातील तरतुदीनुसार अत्यंत किचकट बिंदुनामावलीचे काम पूर्ण करून महाराष्ट्र शासनाच्या पवित्र पोर्टलवर प्राथमिक शिक्षकांच्या एकूण ५८५ पदांची जाहिरात अपलोड केली आहे. शासनस्तरावर तांत्रिक पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पवित्र पोर्टल परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना लवकरच विकल्प भरण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली जाणार असून संपूर्ण भरती प्रक्रिया पुढील एक ते दीड महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची जाहिरात अपलोड झाल्याची माहिती दिली. दरम्यान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाच्या धोरणानुसार इच्छुक सेवानिवृत्त शिक्षकांकडून अर्ज मागवून जिल्ह्यात २५१ सेवानिवृत्त शिक्षकांची तात्पुरत्या मानधनावर नियुक्ती करण्यात आली आहे.

दुर्गम भागात सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होत नसल्याने अशा ठिकाणी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ग्रामपंचायत स्तरावर स्वेच्छेने सेवा देण्यास इच्छुक शिक्षक स्वयंसेवकांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याचे आवाहनही करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षक भरतीची संपूर्ण प्रक्रिया शासनाने वेळोवेळी जारी केलेले शासन निर्णय, परिपत्रके आणि पवित्र पोर्टलच्या कार्यपद्धतीनुसार पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. भरतीसंदर्भातील अद्ययावत सूचना आणि पुढील प्रक्रिया जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी पवित्र पोर्टलवरील माहिती नियमितपणे पाहावी, असे आवाहन जिल्हा परिषद चंद्रपूरच्या प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT