चंद्रपूर : वरोरा शहरातील जिजामाता वॉर्ड येथे राहणारे सचिन सुरेश कुथे (वय : ३६ वर्षे) यांनी स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन कुथे हे सिलिंडर कॉन्ट्रॅक्टर म्हणून कार्यरत होते. आज सकाळी सुमारे ८ वाजताच्या दरम्यान त्यांच्या आई त्यांना उठविण्यासाठी खोलीत गेल्या असता त्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने परिसरातील नागरिक व पोलिसांना घटनेची माहिती दिली.
सचिन कुथे यांच्या पश्चात पत्नी, दोन वर्षांचा मुलगा आणि अवघ्या सहा महिन्यांची मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक व परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, जीवन संपवण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.