राजुरा तालुक्यातील वर्धा नदीकाठी वसलेले लहान मार्डा गावात यादवकालीन शिवलिंग, शिव-पार्वती, गणपती तसेच वाघोबाची मूर्ती आढळल्‍याचा दावा पुरातत्त्‍व अभ्‍यासकांनी केला आहे.  Pudhari
चंद्रपूर

Chandrapur news : राजुरा तालुक्यातील लहान मार्डा गावाचा यादवकालीन वारसा उजेडात

वर्धा नदीकाठी शिवलिंग, शिव-पार्वती, गणपती व वाघोबाची प्राचीन मूर्ती आढळली; पुरातत्त्व अभ्यासकांचा दावा

पुढारी वृत्तसेवा

Rajura historical discovery

चंद्रपूर,पुढारी वृत्तसेवा : राजुरा तालुक्यातील वर्धा नदीकाठी वसलेले लहान मार्डा हे गाव गोंडकाळापेक्षाही अधिक प्राचीन असून येथे यादवकालीन शिवलिंग, शिव-पार्वती, गणपती तसेच वाघोबाची मूर्ती आढळून आली आहे. यामुळे परिसराच्या ऐतिहासिक वारशावर नव्याने प्रकाश पडला असल्याची माहिती पुरातत्त्व संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.

लहान मार्डा पसिरात आढळली प्राचीन अवशेष

दोन दिवसांपूर्वी निवृत्त शिक्षक विजय टोंगे यांच्या निमंत्रणावरून प्रा. चोपणे यांनी लहान मार्डा परिसराचा इतिहास अभ्यास दौरा केला. यावेळी दिलीप उरकुडे हेही उपस्थित होते. पाहणीदरम्यान परिसरात प्राचीन मातीची भांडी, हांडे, मडकी, दगडी अवजारे, लोखंडी शस्त्रांचे अवशेष, प्राण्यांची हाडे व दात तसेच जुन्या पाषाणयुगीन मानवांनी वापरलेली साधने आढळून आली.

५०० वर्षांपूर्वीपासून परिसरात कुणबी समाज वास्तव्यास

अभ्यासात असेही समोर आले की, सुमारे ५०० वर्षांपूर्वीपासून या परिसरात कुणबी समाज वास्तव्यास होता. मात्र वर्धा नदीच्या पुरामुळे सुमारे ६५ वर्षांपूर्वी गावाचे स्थलांतर करून नवीन गाव वसविण्यात आले. जुन्या गावाच्या ठिकाणी वर्धा नदीच्या उंच काठावर यादवकालीन गवळी समाजाची वस्ती होती. त्यांनी येथे उघड्या स्वरूपातील शिवमंदिर उभारले होते. या मंदिरात मोठे शिवलिंग, शिव-पार्वती, गणपती आणि विशेष म्हणजे वाघोबाची लहान मूर्ती स्थापित करण्यात आली होती.

२५ हजार ते ५ हजार वर्षांपूर्वीची दगडी अवजारे आढळली

प्रा. चोपणे यांनी सांगितले की, वणी व राजुरा तालुक्यातील अनेक ठिकाणी २५ हजार ते ५ हजार वर्षांपूर्वीच्या मानवांनी वापरलेली दगडी अवजारे आढळून आली आहेत. या प्रदेशात गोंडकाळापेक्षाही प्राचीन सातवाहन, वाकाटक आणि यादवकालीन वस्तीस्थळांचे अवशेष सापडत आहेत. या ऐतिहासिक स्थळांच्या संशोधनासाठी प्रयत्न सुरू असून ग्रामीण भागातील नागरिकांनी जुन्या गावांची, मंदिरांची व इतर ऐतिहासिक स्थळांची माहिती संशोधकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

इतिहास संशोधनाला चालना

लहान मार्डा येथे आढळलेल्या प्राचीन मूर्ती, शिवलिंग आणि अन्य अवशेषांमुळे राजुरा तालुक्याच्या इतिहासातील अनेक अज्ञात पैलू समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या ठिकाणाचे शास्त्रीय पुरातत्त्वीय सर्वेक्षण झाल्यास परिसराच्या प्राचीन सांस्कृतिक वारशाबाबत अधिक महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT