चंद्रपूर : झाडण्या तोडण्यासाठी नदीकाठावरील जंगलात गेलेल्या एका 55 वर्षीय महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आली. रेखाबाई मारोती येरमलवार असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्यसा महिलेचे नाव आहे.
सावली वनपरिक्षेत्रा अंतर्गत व्याहाड खुर्द उपवन परिक्षेत्रातील , सामदा बुज. बिटातील निलंसनी पेठगाव येथील रहिवासी रेखाबाई मारोती येरमलवार ही महिला काल २९ नोव्हेंबर रोजी झाडण्या कापण्यासाठी निलंसनी पेठगावला लागून असलेल्या वैनगंगा नदीकाठावरील जंगलात गेली होती. नदीलगतच्या नाल्याजवळ झाडण्या कापत असताना दबा धरून असलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला आणि तिचा मृत्यू झाला. ती सायंकाळ घरी परत आली नाही त्यामूळे मुलगा महादेव येरमलवार, राकेश येरमलवार व गावकऱ्यांनी रात्री तिचा शोध घेतला, परंतु शोध लागला नाही.
या घटनेची माहिती वनविभागास देण्यात आली. सामदा बिटाचे वनरक्षक आणि पीआरटीचे कार्यकर्ते आकाश चुदरी, छगन बोरकुटे, प्रफुल्ल गेडाम, इंदारशाह पेंदाम, मंगेश कांबळे यांनी गावाशेजारी गस्त घातली. रात्रीच्या सुमारास तो वाघ गावातील जिल्हा परिषद शाळेला लागून असलेल्या बालाजी कात्तलवार यांचे घराशेजारी आल्याने पीआरटीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून त्यास हाकलून लावले.
आज सकाळी वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक परमेश्वर खेडकर, वनपरिक्षेत्राधिकारी विनोद धुर्वे, क्षेत्र सहाय्यक आर. एम. सूर्यवंशी, क्षेत्र सहाय्यक राजू कोडापे, बिट वनरक्षक बी. के. सोनेकर, आर. एस. डांगे आणि गावकऱ्यांनी पुन्हा शोध घेतला असता वैनगंगा नदीकाठावरील जंगलात महिलेचा मृतदेह आढळून आला. वनविभागाने मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविले. मृतकाच्या कुटुंबीयांना तात्काळ २५ हजार रुपयांची मदत देण्यात आली. या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . निलंसनी पेठगाव हे नदीकाठावर असल्याने या परिसरात नेहमीच वाघाचा संचार आहे. वनविभागाने गावाबाहेर सौर ऊर्जेचे दिवे लावावे आणि वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.