चंद्रपूर : जिल्ह्यात पुन्हा एकदा मानव-वन्यप्राणी संघर्षाची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नागभीड तालुक्यातील किटाळी मेंढा जवळील हनुमान मंदिर परिसरातील जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. वनिता शंकर उईके (वय ५५) असे मृत महिलेचे नाव असून, आज मंगळवार (दि. १९) रोजी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किटाळी मेंढा येथील वन विकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक ६९ मध्ये सकाळी ९.०० वाजताच्या सुमारास वनिता उईके या इतर चार ते पाच महिलांसोबत तेंदूपत्ता संकलनासाठी गेल्या होत्या. दररोजच्या उदरनिर्वाहासाठी जंगलावर अवलंबून असलेल्या या महिला नेहमीप्रमाणे काम करत असताना अचानक वनिता उईके या इतर महिलांच्या नजरेआड झाल्या.
काही वेळ उलटल्यानंतरही त्या दिसून न आल्याने सोबतच्या महिलांनी त्यांचा शोध घेतला. मात्र त्या सापडल्या नाहीत. त्यामुळे घाबरलेल्या महिलांनी गावात फोन करून माहिती दिली. गावातील काही नागरिक घटनास्थळी पोहोचले असता, एका पट्टेदार वाघाने वनिता उईके यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार मारल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे तर वाघ मृतदेहाजवळ बसून त्यांना खात असल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी पाहिले. हे भीषण दृश्य पाहून गावकऱ्यांमध्ये मोठी दहशत पसरली.
घटनेची माहिती मिळताच वनविभाग, पोलीस विभाग आणि वन विकास महामंडळाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. नागभीड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोकाटे, वन विकास महामंडळाचे एस. टी. वाढीवा तसेच वन परिक्षेत्र अधिकारी भारती बगमारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
या घटनेमुळे जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी जाणाऱ्या मजुरांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षी हजारो गरीब कुटुंबे उदरनिर्वाहासाठी जंगलात जाऊन तेंदूपत्ता संकलनाचे काम करतात. मात्र वाढत्या वाघांच्या हालचाली आणि वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
वनिता उईके यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे. जंगलाशी रोज संघर्ष करत जीवन जगणाऱ्या मजुरांच्या वेदनादायी वास्तवाचे हे आणखी एक विदारक उदाहरण ठरले आहे. या घटनेनंतर वन विभागाने जंगल परिसरात सतर्कता वाढविण्याची तसेच तेंदूपत्ता संकलनासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.