Woman Electrocuted Nagbhid Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Woman Death | नागभीड येथे लग्न कार्यात शोककळा: कपडे वाळत टाकताना विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू

स्वागत समारंभाआधीच घडली हृदयद्रावक घटना

पुढारी वृत्तसेवा

Woman Electrocuted Nagbhid

चंद्रपूर: नागभीड येथे आनंदाच्या वातावरणात सुरू असलेल्या लग्न समारंभावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. कपडे वाळत टाकताना विजेचा धक्का लागून एका महिलेचा मृत्यू झाल्याने लग्नघरासह संपूर्ण परिसर शोकमय झाला आहे.

नागभीड  येथील बाबुरावजी कायरकार यांच्या घरी सुरू असलेल्या लग्न समारंभात अचानक दुर्दैवी घटना घडून आनंदाचे वातावरण क्षणात शोकमय झाले. बाबुरावजी कायरकार यांची मुलगी स्नेहा विशाल वरभे (रा. भद्रावती) या आपल्या भावाच्या लग्नासाठी माहेरी नागभीड येथे आल्या होत्या.

१२ एप्रिलरोजी विवाह सोहळा पार पडला होता, तर १३ एप्रिल रोजी स्वागत समारंभाची तयारी सुरू होती. घरात पाहुण्यांची मोठी वर्दळ असल्याने स्नेहा या घरकामात मदत करत होत्या. दरम्यान, घरातील खाली पडलेले कपडे वाळत टाकण्यासाठी त्या बाहेर गेल्या असता त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या धक्क्याने त्या जागीच कोसळल्या. घटनेनंतर त्यांना तात्काळ स्थानिक खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, नागभीड येथे हलविण्याचा सल्ला दिला.

ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे लग्नघरात शोककळा पसरली असून उपस्थित पाहुण्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत स्नेहा यांच्या पश्चात पती व १४ वर्षांची जुळी मुले असा परिवार आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT