Wildlife Census : उद्या सोमवारी ताडोबाच्या बफर आणि कोअर झोनमध्ये १७६ मचाणीवरून वन्यप्राणी गणना File Photo
चंद्रपूर

Wildlife Census : उद्या सोमवारी ताडोबाच्या बफर आणि कोअर झोनमध्ये १७६ मचाणीवरून वन्यप्राणी गणना

बफर मध्ये ८१ तर कोअर मध्ये ९५ मचाणीवरून २४४ पर्यटक, अधिकारी, कर्मचारी घेणार निसर्गानुभव

पुढारी वृत्तसेवा

Wildlife census to be conducted from 176 platforms in Tadoba's buffer and core zones tomorrow, Monday

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा

उद्या सोमवारी 12 मे रोजी बुध्द पौर्णिमेच्या रात्री लखलत्या चंद्रप्रकाशात ताडोबातील बफर व कोअर झोनमध्ये वन्यप्राणी गणना होणार आहे. बफर मध्ये 81 तर कोअरमध्ये 95 मचाणीवरून 245 पर्यटक, अधिकारी, कर्मचारी निसर्गानुभव घेत प्राणी गणना करणार आहेत. दोन्ही झोनमध्ये वनविभागाने तयारी पूर्ण केली असून, पर्यटक व अधिकारी सज्ज झाले आहेत अशी माहिती ताडोबा प्रशासनाने दिली आहे.

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण चंद्र असतो. लख्ख प्रकाश पडतो. ह्या प्रकाशात वन्यप्राण्यांच्या हालचाली स्पष्टपणे टिपता येतात. त्यामुळे रात्रीचे निरीक्षण सोपे होते. तसेच, उन्हाळ्याचा काळ असल्याने प्राणी जलस्त्रोता जवळ दिसतात, ज्यामुळे त्यांची गणना सोपी होते. त्यामुळेच परंपरागत काळापासून चालत आलेली वन्यप्राणी गणना बुध्द पौर्णिमेच्या रात्री न चुकता म्हणजे उद्या सोमवारी केली जाणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प देश विदेशात व्याघ्र दर्शनाकरीता प्रसिध्द स्थळ आहे. उद्या सोमवारी  (12 मे) ला सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ताडोबातील बफर व  कोअर झोनमध्ये प्राणी गणना पार पडणार आहे. बुध्द पौर्णिमेच्या रात्री होणारी वन्यप्राणी गणना हा एक निसर्गानुभवाचा कार्यक्रम आहे. बफर झोनमध्ये वन्यप्राणी गणना हि निसर्ग, पर्यटनप्रेमी किंवा अशासकीय संस्था यांचे माध्यमातून केली जाते. या निसर्गानुभवाकरीता ऑनलाईन प्रवेश देण्यात आले असून बफर झोन मध्ये 162 पर्यटनप्रेमींनी नोंदणी केली आहे.

हे पर्यटक निसर्ग अनुभवातून प्रत्यक्ष प्राणी गणना करणार आहेत.  ही प्राणी गणना तयार केलेले पाणवठे किंवा नैसर्गिक पाणवट्याजवळ करण्यात येणार आहे. बफरझोनमध्ये 81 मचान उभारण्यात आल्या आहेत. एका मचानीवर 2 पर्यटक आणि 1 गाईड राहतील. प्रगणनेकरीता आवश्यक साहित्य वनविभागाच्यावतीने पुरविले जाणार आहे. ताडोबातील बफर झोनमध्ये मोहूर्ली, मुल, चंद्रपूर, शिवणी, पळसगाव व खडसंगी आदी 6 वनपरिक्षेत्रात 162 पर्यटक प्राणी गणना करणार आहेत.

तर ताडोबातील कोअर झोन हा अतीसंवेदनशील भाग आहे. त्यामुळे कोअर झोनमध्ये वन्यप्राण्यांची गणना ही ताडोबातील वनविभागाचे अधिकारी व कर्मचारीच स्वत: करणार आहेत. याकरीता कोअर झोनमध्ये 95 मचानी उभारण्यात आल्या असून 183 अधिकारी कर्मचारी सज्ज झाले आहेत. या ठिकाणी पर्यटकांना संधी देण्यात येत नाही.

दोन्ही ठिकाणी उद्या सोमवारी सायंकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी 6 वाजेपर्यंत तब्बल 12 तास ही प्रगणना होईल. त्यानंतर निसर्गप्रेमींना त्या ठिकाणावरून परत जावे लागेल. तत्पूर्वी या ठिकाणी 16 प्रवेशद्वारावरून निसर्गानुभवाचा आनंद घेणाऱ्या 162 पर्यटनप्रेमींना वनविभाग उद्या सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत गणना होणाऱ्या मचाणीच्या ठिकाणापर्यंत पोहचविणार आहे.

बुध्द पौर्णिमेच्या रात्री होणारी वन्यप्राण्यांच्या गणनेतील माहिती फक्त डाटा सकंलन म्हणून करण्यात येते, त्या माहितीच्या आधारे वन्यप्राण्यांची आकडेवारी घोषीत केली जात  नाही. गणना करणाऱ्या निसर्गप्रेमींच्या सुरक्षेकरीता वनाधिकारी उपस्थित राहतील. निसर्गप्रेमींना भोजन व अन्य सुविधा स्वत: करावी लागणार आहे.

निसर्गप्रेमी बघतील याची देही याची डोळा

कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत. चंद्रपूरचा पारा 42 अंशापार गेला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची भटकंती पाणी पिण्यासाठी पाणवट्याकडे होणार असून, निसर्गप्रेमींना हा अनुभव याची डोळा याची देही पाहता येणार आहे. पाणवट्याशिवाय नैसर्गीक पाण्याच्या स्त्रोतांकडेही वन्यप्राणी भटकंती करणार असल्याने पर्यटनप्रेमींना रात्रभर जागून निसर्गानुभवाचा मनमुराद आनंद घेता येणार आहे. या निसर्गानुभवाचा खरा उद्देश म्हणजे वन्यप्राण्यांबद्दल आत्मीयता निर्माण करणे, वन्यप्राण्यांबाबत जनजागृती करणे हा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT