चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा
ताडोबा अभयारण्यात पर्यटन सफारी करण्याकरता निघालेल्या मुंबई येथील पर्यटकांच्या वाहनाला रान डुक्क्राने जबर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन झाडाला जाऊन आदळले. यामध्ये वाहनात बसलेले चौघेजण जखमी झाले. जखमींना चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. हा अपघात आज शनिवारी (19 एप्रिल) ला सीदेवाही चिमूर मार्गावरील गोंडमोहाडी फाट्याजवळ सकाळी सहाच्या सुमारास घडला. शिरसाळा प्रवेशद्वारातून हे पर्यटक सफारी करणार होते. यामध्ये जंगली डुक्कर जागीच ठार झाला. (Tadoba Sanctuary)
ताडोबा बफर झोन क्षेत्रातील गोंडमोहाळी फाट्याजवळ ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आज शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सिरसाळा प्रवेशद्वारावरून सफारी करण्याकरता मुंबई येथून योगेश कमलिया (वय 33), दीक्षा जया शेट्टी (वय 34) धीरज हेगडे (वय 32) नमिता छाभरा (वय 34 ) रा. मुबंई हे चार पर्यटक काल आले होते. आज सकाळी ते एका खासगी रिसॉर्टवरून स्वतःचे एम एच 48 ए टी 0566 या चारचाकी वाहनाने बफर झोनमधील शिरकाळा प्रवेशद्वारावर जंगल सफारीकरीता निघाले होते.
गोंडमोहाडी फाट्याजवळ जंगलातील निघालेल्या रानडुक्कराने वाहनाला जबर धडक दिली. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन झाडाला जाऊन आदळले. वाहनातील चौघे किरकोळ जखमी झाले. एका पर्यटकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णलय चिमूर येथे भरती करण्यात आले आहे. वाहनाला डुकराने भीषण धडक दिल्याने डुक्कर जागीच ठार झाला. वनविभागाच्या वतीने वन्यजीव अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.