चंद्रपूर : वरोरा येथील तालुका क्रीडांगणावर आयोजित करण्यात येणाऱ्या कल्पतरू व्यावसायिक मेळाव्याला तीव्र विरोध होताना दिसत आहे. क्रीडांगणाचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करण्यास विरोध दर्शवत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले असून, या आंदोलनाला विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा पाठिंबा मिळत आहे.
शिवसेनेचे मनिष जेठाणी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकसभा संपर्कप्रमुख मुकेश जीवतोडे, नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून समर्थन दिले. क्रीडांगण हे खेळाडू आणि युवकांसाठी असलेले महत्त्वाचे ठिकाण असून, त्याचा व्यावसायिक मेळाव्यासाठी वापर करण्याच्या निर्णयावर आंदोलकांनी आक्षेप घेतला आहे.
आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, मेळावा आयोजित करण्यासाठी केवळ मैदान वापरण्याची परवानगी पुरेशी नसून पोलीस विभाग, अग्निशमन विभाग, विद्युत सुरक्षा, खाद्यपदार्थ विक्री तसेच संबंधित इतर विभागांच्या आवश्यक परवानग्या घेणे गरजेचे आहे. या सर्व विभागांची अधिकृत मंजुरी घेण्यात आली आहे का, याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, अधिकृत परवानगी मिळण्यापूर्वीच ३१ ऑक्टोबरपासून मेळाव्याच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. यासंदर्भात तहसीलदारांकडे लेखी तक्रार देऊनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचे मनिष जेठाणी यांनी सांगितले. या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांमार्फत संयुक्त तपासणी करावी आणि मेळाव्यासाठी घेण्यात आलेल्या परवानग्यांची सत्यता पडताळावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
दरम्यान, क्रीडांगणाच्या वापराबाबत प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा आणि नियमांचे उल्लंघन झाले असल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली आहे. प्रशासनाकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल, असा इशाराही मनिष जेठाणी यांनी दिला आहे. आता या आंदोलनानंतर प्रशासन कोणती भूमिका घेते आणि क्रीडांगणाच्या वापराबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे वरोरा शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.